जवळा येथे पतीचा डोक्यावर पाटा टाकून खून; पत्नीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 14:20 IST2020-06-02T14:20:00+5:302020-06-02T14:20:52+5:30
गेली काही वर्षांपासून या दाम्पत्यामध्ये वाद निर्माण झाले. याच कारणावरून त्यांच्यात नेहमी भांडणं होत होती.

जवळा येथे पतीचा डोक्यावर पाटा टाकून खून; पत्नीला अटक
यवतमाळ: पतीच्या डोक्यावर दगडी पाटा टाकून पत्नीने खून केल्याची घटना जवळा (ता.आर्णी) येथे सोमवारी रात्री घडली. सदर प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. राजेंद्र शालीग्राम चुटे (५३) रा.जवळा असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी संगीता राजेंद्र चुटे (४५) हिला अटक केली आहे. शेतकरी, शेतमजूर कुटुंबात घडलेल्या या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे.
बाभूळगाव तालुक्याच्या दाभा(पहूर) येथील मूळ रहिवासी असलेले राजेंद्र शालीग्राम चुटे हे सहपरिवार गेली काही वर्षांपासून जवळा येथे स्थायिक झाले आहे. शेती आणि शेतमजुरी करून त्यांचा कुटुंबाचा गाडा चालत आहे. मात्र गेली काही वर्षांपासून या दाम्पत्यामध्ये वाद निर्माण झाले. याच कारणावरून त्यांच्यात नेहमी भांडणं होत होती. सोमवारी या वादाचे पर्यवसान राजेंद्र चुटे यांच्या खुनात झाले.
पती-पत्नी एका खोलीत आणि दोन मुले दुसऱ्या खोलीत झोपून होती. हीच संधी साधत पत्नी संगीता हिने राजेंद्र यांच्या डोक्यात दगडी पाटा घातला. त्यातच ते ठार झाले. या प्रकाराची माहिती सकाळी पुढे आली. पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनेचा पंचनामा करून संगीता हिला अटक करण्यात आली. आर्णी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.