…अन् नाग नदीत रक्तरंजित थरार, मोबाईलमध्ये लाईव्ह मर्डर कैद; अनैतिक संबंधातून एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 11:54 PM2021-06-22T23:54:24+5:302021-06-22T23:56:46+5:30

मनाचा थरकाप उडवणारे हे हत्याकांड कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडले.

Murder of one in an immoral relationship live murder captures in mobiles at Nagpur Nag river | …अन् नाग नदीत रक्तरंजित थरार, मोबाईलमध्ये लाईव्ह मर्डर कैद; अनैतिक संबंधातून एकाची हत्या

…अन् नाग नदीत रक्तरंजित थरार, मोबाईलमध्ये लाईव्ह मर्डर कैद; अनैतिक संबंधातून एकाची हत्या

googlenewsNext
ठळक मुद्दे मुख्य आरोपी गोलू धोटे आणि साथीदार गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. योगेश मिळेल ते काम करायचा. सुनील धोटेसोबत त्याची ओळख असल्याने घरी जाणे-येणे होते. त्यातून सुनीलच्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध निर्माण झाले. धोटेच्या आईने योगेशला सुनेसोबत आक्षेपार्ह स्थितीत बघितले. तिने गोलूला सांगितले.

नागपूर - नदीच्या पाण्यात एक जण दुसऱ्याची गचांडी धरून त्याच्यावर शस्त्राचे सपासप घाव घालत असतो. नदीचे पाणी रक्ताने लाल झालेले असते. जीवाच्या आकांताने नको मारू, नको मारू, म्हणत दुसरी व्यक्ती ओरडत असतो. मोठी हिंमत करून एक जण धावतो अन् मारेकऱ्याच्या हातून धारदार शस्त्र हिसकावून त्याला बाजूला नेतो. नंतर ओरडणाऱ्याचे कलेवर पाण्याच्या प्रवाहाने वाहू लागते अन् नदीच्या काठावर जमलेल्या गर्दीतील बघे मोबाइलमध्ये या लाईव्ह मर्डरची क्लीप तयार करतात. ती सोशल मीडियावर व्हायरल होते अन् पुन्हा एकदा उपराजधानीत खळबळ निर्माण होते.

मनाचा थरकाप उडवणारे हे हत्याकांड कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडले. यातील मृताचे नाव योगेश आनंद डोंगरे ऊर्फ धोंगडे (वय ३२) आणि आरोपींची नावे सुनील ऊर्फ गोलू अरुण धोटे (वय २६), हर्ष उमाळे (वय ३३) आणि कांचा ऊर्फ ऋषिकेश धुर्वे आहे. मृत योगेश तसेच आरोपी शिवाजीनगरात राहतात. मुख्य आरोपी गोलू धोटे आणि साथीदार गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. योगेश मिळेल ते काम करायचा. सुनील धोटेसोबत त्याची ओळख असल्याने घरी जाणे-येणे होते. त्यातून सुनीलच्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध निर्माण झाले. ते लक्षात आल्यानंतर आरोपी सुनीलने त्याला समजही दिली, मात्र, योगेश ऐकायला तयार नव्हता. शनिवारी धोटेच्या आईने योगेशला सुनेसोबत आक्षेपार्ह स्थितीत बघितले. तिने गोलूला सांगितले. तेव्हापासून सुनील त्याच्या साथीदारांसह योगेशचा गेम करण्यासाठी त्याला शोधू लागले. याची कुणकुण लागताच योगेश घरून पळून गेला.

सोमवारी दुपारी १२च्या सुमारास आरोपी सुनील आणि साथीदार योगेशच्या घरी पोहोचले. त्यांनी योगेशला मारहाण केली. जीव धोक्यात असल्याचे पाहून कशीबशी सुटका करून घेत योगेशने पळून जाण्यासाठी नाग नदीच्या पाण्यात उडी घेतली. पलीकडच्या काठावर सहज निघून जाऊ, असे त्याला वाटले. मात्र नदीत चिखल गाळ असल्याने त्याला ते शक्य झाले नाही. इकडे सुनीलने त्याच्या मागेच पाण्यात उडी घेतली आणि योगेशची गचांडी पकडून त्याच्यावर तो शस्त्राचे सपासप घाव घालू लागला. योगेश ‘नको मारू... नको मारू... ’म्हणत ओरडत होता. मात्र आरोपी त्याच्यावर शस्त्राचे घाव घालत होता.

योगेशच्या रक्ताने नाग नदीचे पाणी लाल झाले. विशेष म्हणजे, योगेशच्या मदतीला धावण्याऐवजी मोठ्या संख्येतील बघ्यांनी लाईव्ह मर्डरची मोबाइलमध्ये क्लीप बनविण्यालाच प्राधान्य दिले. एक जण मात्र हिंमत करून धावला आणि त्याने धोटेच्या हातातील शस्त्र हिसकावून त्याला बाजूला केले. तोपर्यंत योगेशने जीव सोडला होता. माहिती कळताच कोतवाली पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी योगेशला मेडिकलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दुसऱ्यांदा व्हिडीओ व्हायरल

युनिट तीनच्या पथकाने या प्रकरणात आरोपी सुनील धोटे आणि हर्ष उमाळेला अटक केली. कांचाचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, योगेशच्या हत्येचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाल्या बिनेकर हत्याकांडाची आठवण ताजी झाली. बाल्याची गेल्या वर्षी बोले पेट्रोल पंप चौकात गुंडांच्या टोळीने अशीच अमानुष हत्या केली होती. त्यावेळीसुद्धा असाच व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता.

Web Title: Murder of one in an immoral relationship live murder captures in mobiles at Nagpur Nag river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.