मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 08:32 IST2025-05-08T08:32:19+5:302025-05-08T08:32:49+5:30
या हत्येत बरकत राठोड या विवाहित महिलेची भूमिका समोर येताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
जयपूर - राजस्थानच्या जयपूर पोलिसांनी ४४ वर्षीय महिलेला प्रियकराच्या हत्येच्या आरोपात अटक केली आहे. मुंबईच्या एका हॉटेलमध्ये हा खून करण्यात आला. मात्र या हत्येला आत्महत्येचा बनाव रचण्यात आला. विवाहित महिला बरकत राठोड हिने मागील आठवड्यात ४७ वर्षीय व्यापारी इमामुद्दीन मंसूरीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह मालाड पश्चिमेतील एका हॉटेलमध्ये सोडून पळून गेली होती. अखेर पोलिसांनी तिचा शोध घेत तिला अटक केली आहे.
माहितीनुसार, बरकतने जेव्हा मंसूरीची हत्या केली त्यानंतर तिने त्याच्या मोबाईलवरून कुटुंबाला आणि पोलिसांना एक मेसेज पाठवला. ज्यात पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख करण्यात आला. मीरा रोड भागात राहणाऱ्या मंसूरी आणि बरकत राठोडचे प्रेमसंबंध होते. या अफेअरची माहिती कुटुंबाला कळली तेव्हा मंसूरीला बरकतसोबतचे संबंध तोडण्यास मजबूर करण्यात आले. मंसूरीचा मृतदेह सापडल्यानंतर तो पोस्टमोर्टमला पाठवला. त्यात त्याने विष दिल्याचे आणि गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचं रिपोर्टमधून समोर आले.
या हत्येत बरकत राठोड या विवाहित महिलेची भूमिका समोर येताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेत पोलिसांनी राजस्थानातून बरकत राठोडला अटक केली. मंसूरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी बरकत राठोड या आरोपी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या खून प्रकरणी आणखी तपास करत आहे.
काय आहे प्रकरण?
रविवारी ४ मे रोजी मालाड स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये व्यापाराचा मृतदेह सापडला. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या मुलाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. संध्याकाळी ४ च्या सुमारास फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मृत इमामुद्दीन मंसूरीचा मेसेज आला. मानसिक तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यात म्हटलं होते. त्यानंतर मंसूरी यांचा मुलगा अहमद राजा याने तातडीने पोलिसांना फोन करून वडिलांचे लोकेशन तपासण्याची मागणी केली. पोलिसांनी शोध घेतला असता मंसूरी मालाडच्या हॉटेलमध्ये असल्याचे कळले. त्यानंतर पोलीस, कुटुंब त्या हॉटेलला पोहचले तेव्हा मंसूरी यांचा संशयास्पद मृतदेह सापडला.