कोल्हापुरातील उदगाव येथे तरुणाचा खून, संशयित दोघा आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 15:45 IST2025-02-09T15:45:14+5:302025-02-09T15:45:32+5:30
अनिकेत मोरे व नागेश जाधव यांच्याकडून खुनात वापरलेला चाकू हसगत केला आहे.

कोल्हापुरातील उदगाव येथे तरुणाचा खून, संशयित दोघा आरोपींना अटक
उदगाव : येथील सांगली - कोल्हापूर महामार्गावर हॉटेल समृद्धीमध्ये पूर्ववैमनश्यातून विपुल प्रमोद चौगुले (वय २० राहणार जैन बस्तीजवळ, उदगाव) याचा चाकूने सपासप करून खून केल्याची घटना मध्यरात्री उघडकीस आली. या खून प्रकरणी संशयित आरोपी अनिकेत मोरे व नागेश जाधव दोघे (रा.बेघर वहसात, उदगाव) यांना जयसिंगपूर पोलिसांनी सांगलीतून अटक केली आहे. अनिकेत मोरे व नागेश जाधव यांच्याकडून खुनात वापरलेला चाकू हसगत केला आहे.
विपुल हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचा व संशयित आरोपी यांच्यात पूर्वीचा वाद होता. यातूनच त्याचा खून झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. घटनास्थळी डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळुंके, पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला.
एकच्या सुमारास खून झाल्यानंतर चौगुले याला उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे घोषित केले. यानंतर जयसिंगपूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आहे. दरम्यान, उदगाव येथे सहा महिन्यात दुसरा खून झाल्याने जिल्ह्याचे सुरुवातीचे गाव असलेल्या गावात गुन्हेगारी फोफावत असल्याचे दिसून येत आहे.