पुणे हादरलं! कोंढव्यामध्ये घरात घुसून कोयत्याने वार करत सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 19:00 IST2020-07-11T13:35:19+5:302020-07-11T19:00:29+5:30
पप्पू पडवळ हा पोलिसांच्या रेकोर्ड वरील सराईत गुन्हेगार

पुणे हादरलं! कोंढव्यामध्ये घरात घुसून कोयत्याने वार करत सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या
पुणे : पुण्यातील कोंढवा येथे काही जणांनी घरात घुसून एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करत निर्घृण खून केला. या हल्ल्यात त्या व्यक्तीचा हातही छाटला गेला. या घटनेने पुन्हा एकदा कोंढव्यात ' मुळशी पॅटर्न' सारखा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे.
घनश्याम ऊर्फ पप्पू पडवळ (रा. कोंढवा) असे या खुनी हल्ल्यात मृत्यू झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पप्पू पडवळ हा पोलिसांच्या रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल होते. तसेच यापूर्वी तो कारचालक म्हणून काम करीत होता. एका टोळीकडून याअगोदर देखील त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. सध्या तो व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करीत होता. कोंढव्यातील ब्रम्हा काँट्री बिल्डिंगमधील पाचव्या मजल्यावर तो राहत होता. गेल्या दोन दिवसांपासून तो घरात एकटाच होता. तो फोन उचलत नसल्याने त्याचे नातेवाईक घरी आले. तेव्हा घर आतून बंद होते. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.
शनिवारी सकाळी घरात घुसून काही जणांनी कोयत्याने सपासप वार करत पडवळ याची हत्या केली. या हल्ल्यात त्याचा एक हातही छाटला गेेला आहे. तो मारला गेेेल्याचे समजताच आरोपींनी तिथुन पळ काढला. या थरारक घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी पडवळ याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. हल्लेखोरांचा तपास सुरू आहे.