एमजीरोडवर सराईत गुन्हेगाराचा भोसकून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 23:32 IST2018-11-22T23:32:23+5:302018-11-22T23:32:48+5:30
एमजीरोड येथे शिवाजी स्टेडियमच्या प्रवेशद्वार जवळील बोळीत एका सराईत गुन्हेगारावर धारधार शस्त्राने चौघांनी हल्ला चढवून खून केल्याची घटना घडली.

एमजीरोडवर सराईत गुन्हेगाराचा भोसकून खून
नाशिक : एमजीरोड येथे शिवाजी स्टेडियमच्या प्रवेशद्वार जवळील बोळीत एका सराईत गुन्हेगारावर धारधार शस्त्राने चौघांनी हल्ला चढवून खून केल्याची घटना घडली.
शहरातील एमजीरोड हा गजबजलेला परिसर रात्री साडे नऊ वाजेनंतर शांत होताच पावणे दहा वाजेच्या सुमारास मनीष प्रेमजी रेवर (२९, रा.रामवाडी) यास बोलावून घेत त्याच्या डोक्यात, मानेवर धारदार शस्त्राने हल्लेखोरांनी वार केले. या हल्ल्यात रेवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. दरम्यान, त्याच्या काही मित्रांना माहिती समजल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्यास खासगी रुग्णालयात हलविले; मात्र अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर रेवर यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या खुनाच्या गुन्ह्यात एकूण चार संशयितांची नावे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये एक संशयीत हद्दपार केलेला गुन्हेगार असल्याचे समजते. रेवर याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरीष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी, सहायक निरीक्षक विलास शेळके जिल्हा रुग्णालयात फौजफाट्यासह दाखल झाले. जिल्हा रुग्णालयात जमा झालेल्या गर्दी पंगविली. जुन्या गुन्हेगारी वादातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पंचवटी रामवाडी परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रात्रभर परिसर पिंजत होते. सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली पोलीस ठाण्यांना सतर्कतेच्या सूचना पाटील यांनी दिल्या आहेत.