Murder accused from bihar native aquited in Goa | पत्नीला पेटवून हत्या केल्याचा आरोप असलेल्या पतीची निर्दोष मुक्तता 

पत्नीला पेटवून हत्या केल्याचा आरोप असलेल्या पतीची निर्दोष मुक्तता 

ठळक मुद्देमयत संगिता हिने मृत्यूपूर्व जबाबात सुरुवातील आपल्याला पतीने केरोसिन ओतल्याचे म्हटले होते. सरकार पक्षातर्फे न्यायालयात एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले.  

मडगाव - स्वत: च्या पत्नीवर केरोसीन ओतून तिला पेटवून ठार मारल्याच्या आरोपाखाली मूळ बिहार येथील शामसुंदर पांडे (३७) या संशयिताची निर्दोष सुटका झाली. मयताच्या मृत्यूपुर्व स्वेच्छा जबानीत तफावत आढळून आल्याने त्याच्यावरील खुनाचा गुन्हा न्यायालयात सिध्द होउ शकला नाही. गोव्यातील दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष बी.पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने आज गुरुवारी संशयिताला निर्दोष मुक्त केले. मयत संगिता हिने मृत्यूपूर्व जबाबात सुरुवातील आपल्याला पतीने केरोसिन ओतल्याचे म्हटले होते. 

मात्र नंतर मामलेदाराकडे दिलेल्या स्वेच्छा जबानीत आपण स्वत आग लावून घेतल्याचे म्हटले होते. संशयिताच्यावतीने वकील प्रियेश मडकईकर यांनी बाजू मांडली.
वेर्णा पोलिसांनी शामसुंदर पांडे याच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या ३0२ कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. वेर्णा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक निनाद देउळकर यांनी या खून प्रकरणाचा तपास केला होता. पांडे याच्यावर त्याची पत्नी संगिता देवी पांडे (३६) हिच्यावर केरोसिन ओतून तिला पेटवून दिल्याचा आरोप होता. ६ डिसेंबर २0१८ साली झारिंत - जुवारीनगर येथे ही घटना घडली होती. मागाहून संगिता हिचा ११ डिसेंबरला गोमेकॉत मृत्यू झाला होता.


न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, शामसुंदर हा संजिना कुमार या महिलेकडे भाडेकरु म्हणून रहात होते. पत्नीला पेटवून दिल्यानतंर त्याने घटनास्थळाहून पोबारा केला होता. वास्को रेल्वे स्थानकावर जात असताना खाली पडल्याने तो जखमी झाला होता. वास्को पोलीस ठाण्याच्या रॉबर्ट व्हॅनमधून नंतर त्याला उपचारासाठी चिखली येथील कॉटेज इस्पितळात दाखल केले होते. नंतर गोमेकॉत त्याला उपचारासाठी पाठवून दिले होते. सरकार पक्षातर्फे न्यायालयात एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले.  

Web Title: Murder accused from bihar native aquited in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.