मलकापूर नगरपरिषदेचा नगर अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात, खासगी व्यक्तीलाही अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 22:51 IST2023-07-10T22:50:44+5:302023-07-10T22:51:32+5:30
रस्त्याचे बिल काढण्यासाठी दोघांनी ही लाच स्वीकारली. ही कारवाई मलकापूर येथे सोमवारी सायंकाळी करण्यात आली.

मलकापूर नगरपरिषदेचा नगर अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात, खासगी व्यक्तीलाही अटक
सातारा : मलकापूर, ता. कऱ्हाड येथील नगरपरिषदेचा नगर अभियंता शशिकांत सुधाकर पवार (वय ३७, मूळ रा. मंद्रुळ कोळे, ता. पाटण, जि. सातारा) याला व एका व्यक्तीला ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. रस्त्याचे बिल काढण्यासाठी दोघांनी ही लाच स्वीकारली. ही कारवाई मलकापूर येथे सोमवारी सायंकाळी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे दुय्यम ठेकेदार असून, त्यांची फर्म आहे. तक्रारदार हे मूळ ठेकेदाराच्या फर्मअंतर्गत ठेकेदारीचे काम करतात. तक्रारदार यांनी वाखण भागातील सुनील पवार ते कलबुर्गी घर असे रस्त्याचे काम केले होते. त्याचे एकूण २१ लाख ७५ हजार रुपये बिल झाले होते. त्यापैकी १५ लाख रुपये तक्रारदार यांना मिळाले असून, उर्वरित बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी नगर अभियंता शशिकांत पवार याने लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे लेखी रीतसर तक्रार केली. या तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर सापळा लावण्यात आला. खासगी व्यक्ती सुदीप दीपक एटांबे (वय २९, रा. माउली काॅलनी मलकापूर, ता. कऱ्हाड) याच्याकरवी ३० हजारांची रक्कम स्वीकारली. यानंतर लाचलुचपत अधिकाऱ्यांनी दोघांनाही अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रशांत नलावडे, नीलेश चव्हाण, तुषार भोसले, मारुती अडागळे यांनी केली.