Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 07:51 IST2025-10-31T07:50:56+5:302025-10-31T07:51:39+5:30
Rohit Arya : पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये एका चित्रपटाचं ऑडिशन असल्याचं सांगून एक धक्कादायक घटना घडली.

Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
मुंबईतील पवई परिसरातील आरए स्टुडिओमध्ये एका चित्रपटाचं ऑडिशन असल्याचं सांगून एक धक्कादायक घटना घडली. एका साध्या कास्टिंग कॉलपासून सुरू झालेल्या घटनेने पुढे ३५ मिनिटांत वेगळंच वळण घेतलं. मुंबईपोलिसांच्या क्विक रिअॅक्शन टीमने १७ लहान मुलं, एका वृद्धाला आणि एका महिलेला तातडीने वाचवलं. ३८ वर्षीय रोहित आर्य पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला आणि नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
आठ जणांची कमांडो टीम बाथरूममधून आतमध्ये घुसली आणि हल्ला केला, कमांडरने सुरुवातीला रोहित आर्यशी बोलून परिस्थिती शांततेने सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने बंदूक आणि केमिकल्स दाखून जवळ आलात तर गोळीबार करण्याची आणि जाळून टाकण्याची धमकी दिली. जेव्हा त्याने गोळीबार केला तेव्हा पोलिसांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला. यात तो जखमी झाला.
एअर गन, केमिकल्स, लायटर जप्त
ऑडिशन रूममध्ये गोंधळ उडाला. मुलं भीतीमुळे कोपऱ्यात लपून बसली होती. कमांडो टीम हळूहळू पुढे गेली आणि सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. वैद्यकीय तपासणीनंतर, त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. फॉरेन्सिक टीमने एक एअर गन, काही केमिकल्स आणि एक लायटर जप्त केलं. अधिकाऱ्यांच्या मते, आरोपी मोठा स्फोट किंवा जाळपोळ करण्याचा प्लॅन करत होता. सर्व पुरावे आता चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
मुलांना ओलीस ठेवलं, स्टुडीओ जाळण्याची धमकी
पवई पोलिसांना दुपारी २ वाजताच्या सुमारास फोन आला की, एका व्यक्तीने आर स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवलं आहे आणि तो स्टुडीओ जाळण्याची धमकी देत आहे. पोलिसांनी ताबडतोब परिसराला घेराव घातला आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान, आर्य एक लाईव्ह व्हिडीओ काढत होता, तो दावा करत होता की, त्याच्या मागण्या पैशासाठी नाहीत तर "नैतिक आणि न्यायाशी संबंधित" आहेत.
आरोपी मानसिक तणावाखाली
घटनेनंतर जप्त झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित आर्य म्हणाला, "मी दहशतवादी नाही, मला पैसे नकोत. मला फक्त काही लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. पण जर कोणी चूक केली तर मी हे सर्व जाळून टाकेन." पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोहित आर्य आर स्टुडिओमध्ये काम करत होता आणि एक यूट्यूब चॅनेल देखील चालवत होता. तो अनेक दिवसांपासून मुलांना चित्रपट ऑडिशन्ससाठी आमिष दाखवत होता. मानसिक तणावामुळे त्याने हे धोकादायक पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय आहे.
उपचारांदरम्यान मृत्यू, तपास सुरू
रोहित आर्यला गोळी लागल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याने असे लहान मुलांना ओलीस ठेवण्याचे भयंकर कृत्य का केले हे शोधण्यासाठी पोलीस आता त्याचे व्हिडीओ, सोशल मीडिया आणि मागील रेकॉर्ड तपासत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि परिसरात एकच खळबळ उडाली.