बाबा सिद्दिकींवरील हल्ला फेल झाला असता तर पुण्यातील नेता होता टार्गेटवर; बिश्नोई गँगचा प्लॅन B
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 13:27 IST2024-11-10T13:27:38+5:302024-11-10T13:27:38+5:30
Baba Siddiqui And Lawrence Bishnoi : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाल्यास लॉरेन्स बिश्नोई गँगने प्लॅन बी तयार केला होता.

बाबा सिद्दिकींवरील हल्ला फेल झाला असता तर पुण्यातील नेता होता टार्गेटवर; बिश्नोई गँगचा प्लॅन B
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा प्रयत्न अयशस्वी झाल्यास लॉरेन्स बिश्नोई गँगने प्लॅन बी तयार केला होता. पुण्यातील एका राजकीय नेत्याच्या हत्येचा कट बिश्नोई गँगने रचल्याचा खळबळजनक खुलासा आता करण्यात आला आहे. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान ही बाब समोर आल्याचं मुंबई क्राईम ब्रँचने म्हटलं आहे.
क्राईम ब्रँचच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई गँग पुण्यातील एका नेत्याला जीवे मारण्याचा कट रचत होती आणि हा गुन्हा घडवून आणण्याची जबाबदारी प्लॅन बीमध्ये सामील असलेल्या शूटर्सवर देण्यात आली होती.
मुंबई क्राईम ब्रँचने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल जप्त केलं होतं, त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगचा हा प्लॅन बी उघड झाला. मात्र, पोलिसांनी अद्याप या पुण्याच्या नेत्याची ओळख उघड केलेली नाही. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी यासंबंधित महत्त्वाची माहिती पुणे पोलिसांना दिली आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित संशयित शूटर गौरव विलास अपुने याला शुक्रवारी अटक केल्यानंतर ही माहिती मिळाली आहे. सिद्दिकी यांच्यावरील हल्ला अयशस्वी झाल्यास अपुने हा गँगच्या 'प्लॅन बी'चा भाग होता, असं तपासात उघड झालं आहे.
पोलिसांनी दिलेल्या नुसार, अपुनेने कबूल केलं की तो आणि दुसरा संशयित रूपेश मोहोळ हे २८ जुलै रोजी झारखंडला गेले होते, जिथे त्यांनी शूटर शुभम लोणकरच्या सूचनेनुसार शस्त्रांचं प्रशिक्षण घेतलं. लोणकर हा बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचं समजतं. हे दोघेही २९ जुलै रोजी एक दिवसाच्या सरावानंतर पुण्यात परतले.
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचचा तपास सध्या सुरू असून झारखंडमध्ये नेमके कोणत्या ठिकाणी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले होते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच याप्रकरणी अनेकांना आतापर्यंत विविध ठिकाणांवरून अटक करण्यात आली आहे.