खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:29 IST2025-07-09T11:28:45+5:302025-07-09T11:29:06+5:30
सीए असलेल्या तरुणाला धमकावून त्याच्याकडून तब्बल ३ कोटी उकळण्यात आले.

खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
मुंबईत प्रायव्हेट व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केल्यानंतर तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सीए असलेल्या तरुणाला धमकावून त्याच्याकडून तब्बल ३ कोटी उकळण्यात आले. यानंतर त्रासाला कंटाळलेल्या सीएने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याने तीन पानांची सुसाईड नोट लिहिली. राज मोरे असं या तरुणाचं नाव होतं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
राजने सुसाईड नोटमध्ये दोन जणांना दोषी ठरवलं आहे. यामध्ये सबा कुरेशी आणि राहुल परवानी यांचा समावेश आहे. ज्यांनी त्याचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली होती. राज आणि सबा कुरेशी सोशल मीडियाद्वारे भेटले होते. सबा आणि राहुलने त्याचा व्हिडीओ बनवला आणि त्याला ब्लॅकमेल केलं. राज सांताक्रूझ परिसरात राहत होता.
राजने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, राहुल परवानी आणि सबा कुरेशी यांनी गेल्या १८ महिन्यांत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपींना मोरेच्या शेअर बाजारातील मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक आणि चार्टर्ड अकाउंटंट असल्याने त्याच्या जास्त पगाराच्या नोकरीची माहिती होती. धमकी देऊन दोन्ही आरोपींनी त्याच्याकडून जबरदस्तीने एक आलिशान गाडीही हिसकावली.
खोलीत तीन पानांची सुसाईड नोट सापडली. नोटमध्ये त्याने आईची माफी मागितली आणि काळजी घेण्यास सांगितलं. मुलगा गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली असल्याचं राजच्या आईने पोलिसांना सांगितलं. राजने राहुल आणि सबा यांना त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार धरलं आहे. "मी, राज मोरे, आज आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येसाठी राहुल परवानी जबाबदार आहे. त्याने मला फसवलं आणि अनेक महिने ब्लॅकमेल केलं. माझ्या कंपनीच्या खात्यातून पैसे चोरले. राहुल परवानी आणि साबा कुरेशी माझ्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत" असं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.