NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 12:40 IST2026-04-12T12:39:30+5:302026-04-12T12:40:26+5:30
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) मुंबई युनिटने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. नागपुरात एका आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला.

NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) मुंबई युनिटने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. नागपुरात एका आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला. शनिवारी केलेल्या या धडक कारवाईत पथकाने तब्बल २१० किलो गांजा जप्त केला असून या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेला गांजा मेटल शीट्सच्या आड लपवून पश्चिम बंगालच्या ट्रकमधून नेला जात होता. २० कोटींचा हा गांजा असल्याचं म्हटलं जात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, NCB च्या पथकाने नागपूर परिसरात पश्चिम बंगाल पासिंगच्या एका ट्रकची झडती घेतली. वरवर पाहता ट्रकमध्ये मेटल शीट्स भरलेल्या दिसत होत्या, मात्र नीट तपासणी केली असता, या मालाच्या आत अत्यंत शिताफीने लपवलेली गांजाची पाकिटं आढळून आली. याप्रकरणी ट्रकसह पी. कुमार आणि आर. कुमार या दोन जणांना अटक करण्यात आली.
ओडिशा ते महाराष्ट्र कनेक्शन
अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, हा गांजा ओडिशातील संबलपूर येथून आणल्याचं समोर आलं आहे. संबलपूर हा परिसर अवैध गांजा पुरवठ्याचं मुख्य केंद्र मानलं जातं. या माहितीच्या आधारे NCB ने तातडीने पुढील कारवाई करत नागपूरमधील मुख्य वितरक पाटील आणि वर्मा या दोघांनाही अटक केली आहे.
'या' शहरांमध्ये होणार होता पुरवठा
तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून हा तब्बल २१० किलो गांजा महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पोहोचवण्यात येणार होता. यात प्रामुख्याने:
नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक, पुणे आणि मुंबई या शहरांमधील स्थानिक पेडलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांना हा साठा विकला जाणार होता. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतले आहेत, याचा तपास आता NCB करत आहे "संघटित गुन्हेगारी सिंडिकेट मोडून काढण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी NCB कटिबद्ध आहे. नशामुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहती," असं NCB ने स्पष्ट केलं आहे.