भूत काढण्यासाठी केलेल्या मारहाणीत मायलेकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 06:49 IST2020-07-27T06:49:33+5:302020-07-27T06:49:46+5:30

कल्याणमधील प्रकार; चौघांना अटक

mther and son dies in a beating to exorcise a demon | भूत काढण्यासाठी केलेल्या मारहाणीत मायलेकाचा मृत्यू

भूत काढण्यासाठी केलेल्या मारहाणीत मायलेकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : अंगात भूत असून ते तंत्रमंत्र करून बाहेर निघेल, या अंधश्रद्धेपोटी अंगावर हळद टाकून काठीने केलेल्या बेदम मारहाणीत पंढरीनाथ शिवराम तरे (५०) व चंदूबाई शिवराम तरे (७६) या मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना येथील अटाळी गावात शनिवारी संध्याकाळी घडली.


नातेवाईकानीच हा अघोरी प्रकार केला. या प्रकरणी मांत्रिक व अन्य तिघांना अटक केली आहे. अटाळी येथील गणेशनगरमधील शिवचंद्र सदनमध्ये राहणारे पंढरीनाथ यांची पुतणी कविता कैलास तरे (२७) हिच्या अंगात दैवीशक्ती संचारते, या संशयातून पंढरीनाथ यांची पत्नी रेश्मा आणि दुसरी पुतणी संगीता ही कविताला अटाळी गावात राहणाऱ्या सुरेंद्र पाटील या मांत्रिकाकडे तंत्रमंत्र उपचारासाठी घेऊन जात असे. त्या वेळी मांत्रिक पाटील याने त्यांना पंढरीनाथ व त्यांची आई चंदूबाई या दोघांच्या अंगात भूत आहे आणि ते तंत्रमंत्र करून बाहेर काढावे लागेल, असे सांगितले. मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे अंधश्रद्धेपोटी पंढरीनाथचा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आणि पुतण्या विनायक तरे (२२), पुतणी कविता या तिघांनी शनिवारी दुपारी ४.३० वाजता पंढरीनाथ व त्याची आई चंदूबाई यांच्यावर तंत्रमंत्र करून तसेच त्यांच्या अंगावर हळद टाकून त्यांना काठीने बेदम मारहाण केली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.


या घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी पंढरीनाथच्या अल्पवयीन मुलासह विनायक, कविता आणि मांत्रिक सुरेंद्र पाटील या चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Web Title: mther and son dies in a beating to exorcise a demon