मुलीने आईला प्रियकरासोबत पकडले, धमक्यांमुळे कुटुंब तुटले; पतीसह दोन्ही मुलांनी स्वतःला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:18 IST2025-08-04T10:10:44+5:302025-08-04T10:18:14+5:30
मध्य प्रदेशात एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

मुलीने आईला प्रियकरासोबत पकडले, धमक्यांमुळे कुटुंब तुटले; पतीसह दोन्ही मुलांनी स्वतःला संपवले
Madhya Pradesh Crime: मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यात एकाच कुटुंबातील चार जणांनी एकत्रित आत्महत्या केली होती. आता या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं आहे. चौघांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोट सोडली होती ज्यामध्ये मालमत्तेची विभागणी आणि काही पैशांचा उल्लेख होता. त्यानंतर, या सामूहिक आत्महत्येमागील कारण मृत मनोहर लोधी यांची पत्नी द्रौपदी असल्याचे मानले जात होतं. पण द्रौपदीने चौघांच्याही अंत्यसंस्कारापूर्वी मोठा दावा केला होता. त्यानंतर आता पोलिसांनी द्रौपदीवर कारवाई केली.
सागर जिल्ह्यात झालेल्या सामूहिक आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी रविवारी द्रौपदी आणि तिच्या जोडीदाराला अटक केली. २५-२६ जुलैच्या रात्री मनोहर लोधी (४५), त्यांची आई फूलराणी (७०), मुलगी शिवानी (१८) आणि त्यांचा १६ वर्षांचा मुलगा या कुटुंबातील चार सदस्यांनी आत्महत्या केली होती. तपासादरम्यान, मनोहर लोधीची पत्नी द्रौपदी हिचे सुरेंद्र नावाच्या एका पुरूषाशी संबंध होते, जो मनोहरचा बालपणीचा मित्र होता.
जेव्हा मुलीने तिच्या आईला सुरेंद्रसोबत नको त्या अवस्थेत पाहिले आणि तिने तिच्या वडिलांना कळवले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. कुटुंबाने या प्रकरणाबद्दल द्रौपदीशी बोलण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि तिला संबंध संपवण्यास सांगितले. मात्र तिने कुटुंबाला सांगितले की ती सुरेंद्रशिवाय राहू शकत नाही आणि जर माझ्यावर दबाव आणला तर हुंडा कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करेल असा इशारा दिला होता.
मनोहरने सुरेंद्रला त्यांच्या आयुष्यभराच्या मैत्रीची आठवण करून देत नातेसंबंध संपवण्याची विनंतीही केली, पण त्यानेही नकार दिला. पोलिसांनी सांगितले की, वारंवार येणाऱ्या धमक्या आणि घरातील तणावामुळे त्यांनी आत्महत्या केली. तपासानंतर, पोलिसांनी मनोहरची पत्नी द्रौपदी आणि तिचा जोडीदार सुरेंद्र यांना तुरुंगात पाठवले आहे.
सुसाईड नोटमध्ये मनोहरने त्याच्या मालमत्तेचा एक तुकडाही त्याच्या पत्नीला देणार नाही असं लिहिलं होतं. त्याने त्याची मालमत्ता त्याच्या भावा-बहिणींमध्येही वाटून टाकली. सुसाईड नोटमध्ये मनोहरने त्याच्या तेराव्या दिवसाच्या विधीची व्यवस्था करुन ठेवल्याचेही सांगितले. तेराव्या दिवसाच्या विधीसाठी १ लाख ४० हजार रुपये तिजोरीत ठेवले होते. त्याने त्याचा फोनपे पासवर्ड देखील पत्रावर लिहिला होता.
मनोहरच्या भावाने सांगितले की तो खूप साधा माणूस होता. तो शेती करायचा. त्याने नुकतेच खूप कष्ट करून एक दुमजली घर बांधले होते. तीन महिन्यांपूर्वीच त्याने त्यात गृहप्रवेश केला होता. तो शिकलेला नव्हता, म्हणूनच त्याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याचा मुलगा अनिकेत याला एक पत्र लिहायला लावले होते.
घटनेची माहिती मिळताच मनोहरची पत्नी गावात आली. द्रौपदीने सांगितले सुरेंद्र हा आमच्या कुटुंबातील सदस्य होता. "तो नेहमीच माझ्या पतीसोबत राहिला. ते लहानपणापासूनचे मित्र होते. सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे आणि ते का लिहिले आहे हे मला माहित नाही. मला न्याय हवा आहे. जसे मी सर्वस्व गमावले आहे तसेच त्याचे सर्वस्वही गमावले पाहिजे. मुलांना आम्हाला फक्त एकत्र पाहिले होते. दोन्ही मुलांनी सुरेंद्रला घरात येताना पाहिले. यानंतर, माझ्या पतीने मला २ दिवसांसाठी माझ्या आईच्या घरी जाण्यास सांगितले. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करायचे. मुले थोडी रागावली होती. दोन वर्षांपासून सुरेंद्र आणि मी एकत्र आहोत. आमच्यामध्ये २-४ वेळा तसे घडले. मला न्याय हवा आहे. माझ्यासोबत जे घडले ते सुरेंद्रसोबतही घडले पाहिजे," असं द्रौपदीने सांगितले.