आईचा मृतदेह सापडला दिवाणात तर 28 किमी अंतरावर मुलगा आणि नातवाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 17:01 IST2022-04-13T16:57:30+5:302022-04-13T17:01:26+5:30
Tripple Murder Case : मृत महिलेच्या मुलाचा आणि नातवाचा मृतदेह 28 किमी अंतरावर असलेल्या इंगोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरावडा गावात झुडपात पडलेले आढळले.

आईचा मृतदेह सापडला दिवाणात तर 28 किमी अंतरावर मुलगा आणि नातवाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
मध्य प्रदेशातील उज्जैन येथून तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. वृद्ध महिलेसह तिचा मुलगा आणि नातवाची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण जिवाजी गंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिनगर येथील आहे. पोलिसांना महिलेचा मृतदेह दिवाणात बंद अवस्थेत आढळून आला असून तिचे हात-पाय बांधलेले होते. मृत महिलेच्या मुलाचा आणि नातवाचा मृतदेह 28 किमी अंतरावर असलेल्या इंगोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरावडा गावात झुडपात पडलेले आढळले.
पोलिसांना मृत महिलेचा मुलगा आणि नातवाच्या मृतदेहाजवळ मोबाईल फोन आणि ओळखपत्र सापडले. त्या आधारे पोलीस मृताच्या घरी पोहोचले, तेथे त्यांना कुलूप असल्याचे दिसले. पोलिसांनी तपासासाठी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता खोलीतून दुर्गंधी येत होती. शोध घेत असताना दिवाणात एका वृद्ध महिलेचा मृतदेह पडलेला पोलिसांना दिसला. तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.
गेल्या चार-पाच दिवसांपासून कुटुंबातील एकही सदस्य दिसत नसल्याचे शेजारी राहणारे लोक सांगतात. पोलिसांनी एफएसएल टीमला पाचारण करून घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. वृद्ध महिलेच्या मृतदेहावर धारदार शस्त्राच्या खुणा आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचा दावा केला जात आहे. त्याचवेळी अतिरिक्त एसपी आकाश भुरिया आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी या प्रकरणाचा तपास केला. शेजारी राहणाऱ्या लोकांनी सांगितले की, कुटुंबातील तिघांचा कोणाशीही फारसा संवाद नव्हता. तसेच ते कोणाशीही बोलत नव्हते. व्याजाने पैसे देण्याचे काम घरातील लोक करायचे.