माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 14:21 IST2025-07-26T14:20:26+5:302025-07-26T14:21:00+5:30
विवाहित असलेली अबीरामी बिर्याणीवाल्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने बॉयफ्रेंडसाठी आपल्या दोन मुलांना संपवण्याचा निर्णय घेतला.

माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
अबीरामी नावाच्या महिलेला टिकटॉकवर व्हिडीओ बनवण्याची आणि बिर्याणी खाण्याची खूप आवड होती. याच दरम्यान ती तिच्या घरी बिर्याणी पोहोचवणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. विवाहित असलेली अबीरामी बिर्याणीवाल्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की तिने बॉयफ्रेंडसाठी आपल्या दोन मुलांना संपवण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात आता महिलेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तामिळनाडूतील कांचीपुरममध्ये सप्टेंबर २०१८ मध्ये ही घटना घडली. अबीरामीचं आयुष्यही इतर सामान्य कुटुंबासारखच होतं. तिचा नवरा विजय बँकेत काम करत होता. तिला ७ वर्षांचा मुलगा आणि ४ वर्षांची मुलगी होती. घर सांभाळत असताना तिला टिकटॉकवर व्हिडीओ बनवण्याचं व्यसन लागलं. ती लोकप्रिय होऊ लागली. जवळच एक प्रसिद्ध बिर्याणी दुकान होतं. व्हिडीओ बनवण्यासोबतच तिला स्वादिष्ट बिर्याणी खाण्याचीही आवड होती. मीनाची सुंदरम हा या बिर्याणी स्टॉलवर काम करत असे. तो घरी बिर्याणी देण्यासाठी येत असे.
भेटीचं हळूहळू मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतर झालं. अबीरामीच्या कुटुंबाला या प्रेमाबद्दल समजलं. तेव्हा तिने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवरा आणि पतीला मारण्याचा टोकाचा निर्णय घेतला. सुंदरमने झोपेच्या गोळ्या विकत घेतल्या. आधी दोन्ही मुलांना आणि नंतर विजयला ओव्हरडोस देऊन मारण्याचा प्लॅन आखण्यात आला.
अबीरामीने सर्वांच्या दुधात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. दूध पिऊन मुलगी कायमची झोपी गेली. पण मुलगा अजय आणि पती विजय वाचले. दुसऱ्या दिवशी सकाळी विजय ऑफिसला निघून गेला. मुलगा अजय झोपेच्या गोळ्यांमुळे नशेत होता. तिने मुलाचं तोंड उशीने दाबून त्याची हत्या केली.
अबीरामी आणि सुंदरम यानंतर कन्याकुमारीला पळून गेले. दुसऱ्या दिवशी विजयला त्याच्या मुलांचे मृतदेह आढळले आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. पोलिसांना कळवण्यात आले आणि तपास सुरू झाला. अखेर दोघांनाही पोलिसांनी पकडले आणि दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. याप्रकरणी आता अबीरामी आणि सुंदरम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.