खूप विरोध करूनही मुलाने केले मावस बहिणीशी लग्न, संतापलेल्या सासूने कुऱ्हाडीचे घाव घालून केली सुनेची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 15:29 IST2021-09-13T12:58:28+5:302021-09-13T15:29:37+5:30
Crime News: एका महिलेवर सुनेची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी सदर सासूला अटक करण्यात आली आहे.

खूप विरोध करूनही मुलाने केले मावस बहिणीशी लग्न, संतापलेल्या सासूने कुऱ्हाडीचे घाव घालून केली सुनेची हत्या
रांची - झारखंडमधील जमशेदपूर येथून क्रौर्याची परिसीमा गाठणारी एक बातमी समोर आली आहे. येथील एका महिलेवर सुनेची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. (Crime News) या प्रकरणी सदर सासूला अटक करण्यात आली आहे. सदर महिलेने खूप विरोध केल्यानंतरही तिच्या मुलाने मावस बहिणीशी लग्न केले होते. त्यामुळे ही महिला खूप नाराज होती. (mother-in-law murder her Daughter -in-law in Jamshedpur)
मिळालेल्या माहितीनुसार, गर्भवती सुनेवर कुऱ्हाडीने घाव घालून तिला ठार मारण्यात आल्याची ही घटना चौका ठाणे क्षेत्रातील जांता पहाडधार गावात घडली. ही हत्या रविवारी करण्यात आली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला गीता लायक हिचा मुलगा दीनबंधू याने त्याच्या मावस बहिणीशी विवाह केला होता. या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. दरम्यान, कुटुंबाच्या मर्जीविरोधात जाऊन लग्न केल्याने सासू गीता ही खूप नाराज झाली होती.
रविवारी दीनबंधू लायक हा काम करण्यासाठी पेट्रोलपंपावर गेला. यादरम्यान, काही जुन्या गोष्टीवरून गीता लायक आणि दीनबंधूच्या पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यादरम्यान, गीता लायक हिने कुऱ्हाड घेत सुनेवर हल्ला केला. कुऱ्हाडीचे घाव वर्मी बसल्याने दीनबंधूचा पत्नी गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच चौका पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपी गीता लायक हिला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूच्या भागात खळबळ उडाली. आता या हत्येमागे नेमके कोणते कारण होते, हे पोलीस तपासानंतर समोर येईल.