उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर इथल्या कोतवाली परिसरात बहिणीने छोट्या भावाची चाकूने हत्या केली आहे. भावाची हत्या करून बहीण खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आईकडे गेली आणि तिथे मी त्याला मारून टाकले असं आईला सांगितले. मुलीने सांगितलेला प्रकार ऐकून आईला धक्काच बसला. या प्रकरणी आरोपी बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे. भाऊ दारूच्या नशेत माझी छेड काढत होता असं बहिणीने पोलीस चौकशीत सांगितले.
कोतवालीच्या एका कॉलनीत महिला तिच्या ४ मुलांसह राहत होती. त्यात ३ मुली आणि एक मुलगा होता. महिला मुलासह एका हॉस्पिटलमध्ये साफसफाईचं काम करतात. बुधवारी ती हॉस्पिटलमध्ये काम करत होती. दुपारी ३ वाजता तिची विवाहित मुलगी तिच्याकडे पोहचली आणि तिने भावाची हत्या केल्याचे आईला सांगितले. त्याचा मृतदेह खोलीत पडला आहे. त्यानंतर आई धावत घराकडे गेली आणि मुलाचा मृतदेह पाहून तिला मोठा धक्का बसला. या काळात आरोपी बहीण तिथून पसार झाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपास सुरू केला तेव्हा मृतकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे समोर आले. संध्याकाळी उशीरा पोलिसांनी आरोपी बहिणीला अटक केली. पोलिसांनी बहिणीची चौकशी केली असता भावाच्या हत्येमागे काय कारण होते ते तिने पोलिसांना सांगितले. भाऊ दारू पिऊन नशेच्या अवस्थेत घरी पोहचला होता. त्याने माझी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मी जेव्हा त्याचा विरोध केला तेव्हा त्याने माझ्यावर हात उचलला. त्यात रागाच्या भरात मी चाकूने भावाला घाबरवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात गळ्याला वार लागला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, मुलाच्या मृत्यूमुळे आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पती याआधीच जग सोडून गेला. त्यात मुलाच्या आधारे जीवन जगत होती. परंतु मुलीने म्हातारपणाचा आधारही हिरावला. आता मी कसं जगू...असा सवाल करत आईने मृतदेहाशेजारी हंबरडा फोडला. आरोपी मुलीला कठोरात कठोर शिक्षा द्या अशी मागणी आईने केली आहे.