"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 13:13 IST2025-05-23T13:09:53+5:302025-05-23T13:13:00+5:30
या मुलाने आपले आयुष्य संपवण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली, जी अतिशय धक्कादायक आहे.

"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
लहान मुलांचे मन खूप हळवे असते. छोट्या छोट्या गोष्टींचाही त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. जर त्यांना सर्वांसमोर फटकारले गेले, तर ते त्यांना अपमानजनक वाटू शकतं. मन दुखवल्याने अनेक वेळा ते चुकीचे पाऊल उचलू शकतात. पश्चिम बंगालमधील पानस्कुरा येथे असाच काहीसा प्रकार घडला आहे. आईने सर्वांसमोर दम दिल्याने, सातवीच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या मुलाने आपले आयुष्य संपवण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली, जी अतिशय धक्कादायक आहे.
मुलाने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते, 'आई, मी चोरी केली नाही. मी चिप्सची पाकीटं चोरली नाहीत'. मुलाचे हे शेवटचे शब्द अतिशय हृदयद्रावक आहेत. बाकुल्डा हायस्कूलचा विद्यार्थी असलेल्या १३ वर्षीय कृष्णेंदू दासवर रविवारी एका मिठाईच्या दुकानातून चिप्सचे तीन पॅकेट चोरल्याचा आरोप करण्यात आला होता. गोसाईंबेर मार्केटमधील हे मिठाईचे दुकान शुभंकर दीक्षित या व्यक्तीचे होते. शुभंकरच्या अनुपस्थितीत मुलाने दुकानातून चिप्सची ३ पाकिटे चोरली, असे काही लोकांनी म्हटले.
चिप्स चोरल्याबद्दल मुलाला मारहाण
दुकानाच्या मालकाने दुकानापासून थोड्या अंतरावर चिप्सचे पॅकेट घेऊन चाललेल्या कृष्णेंदूला पाहिले, तेव्हा तो त्याच्या मागे धावला. त्याने चोरीबद्दल त्याची चौकशी केली. मात्र, कृष्णेंदूने दुकानदाराला चिप्सच्या तीन पाकिटांसाठी प्रत्येकी ५ रुपये दराने २० रुपये लगेच देऊ केले. मात्र, उरलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने तो मुलाला पुन्हा दुकानात घेऊन गेला आणि त्याला मारहाण केली. एवढेच नाही तर दुकानदाराने मुलाला सर्वांसमोर माफी देखील मागायलाही लावली.
आई सर्वांसमोर ओरडली!
हे सर्व मुलासोबत नुकतेच घडले होते आणि त्याच्या आईला हे कळताच, ती त्याला पुन्हा त्याच मिठाईच्या दुकानात घेऊन गेली आणि सर्वांसमोर त्याला ओरडली. १३ वर्षांच्या मुलाला याचा इतका त्रास झाला की, त्याने घरी परतताच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत, त्याला तात्काळ तामलुक मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले, जिथे गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.
दुकान मालकाच्या वागण्यामुळे मुलाला असे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले, असा कृष्णेंदूच्या कुटुंबाचा आरोप आहे. कृष्णेंदूच्या मृत्यूनंतर दुकान मालक फरार झाला असून, पोलीस त्याचा तपास घेत आहेत.