आधी दारु पाजली, आयएएस अधिकाऱ्याकडून आयआयटी विद्यार्थिनीची छेडछाड; अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 21:57 IST2022-07-05T21:57:14+5:302022-07-05T21:57:45+5:30
महिला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर सोमवारी रात्रीच एसडीएमला ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली.

आधी दारु पाजली, आयएएस अधिकाऱ्याकडून आयआयटी विद्यार्थिनीची छेडछाड; अटक
झारखंडचे खूंटीचे एसडीएम सय्यद रियाज अहमद यांनी आयएएस अधिकारी पदाची इज्जत खुंटीवर टांगली. आयआयटीच्या इंटर्नला दारु पाजून तिची छेडछाड केली. या आरोपाखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी अहमदला ताब्यात घेतले आहे.
अहमदला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. पीडिता आयआयटीची विद्यार्थिनी आहे ती हिमाचल प्रदेशची राहणारी आहे. ती इंटर्नशिपसाठी खुंटीला आली होती. हे प्रकरण २ जुलैचे असल्याचे सांगितले जात आहे.
महिला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर सोमवारी रात्रीच एसडीएमला ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. एसडीएमने एक जुलैच्या रात्री इंटर्नशिपसाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पार्टी आयोजित केली होती, या पार्टीला विद्यार्थिनी देखील होत्या. पार्टी संपल्यावर काहीजण निघून गेले, यानंतर तिथे दोन विद्यार्थिनी थांबल्या होत्या. यापैकी एकीसोबत एसडीएम छेडछाड करू लागला. तिला दारुही पाजली. यावर ती भडकली आणि पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला.
एसपी अमन कुमार म्हणाले की, एफआयआर दाखल होताच पोलिसांनी एसडीएमला ताब्यात घेऊन चौकशी केली. नंतर त्याला अटक करण्यात आली. उर्वरित लोकांचीही चौकशी सुरू आहे. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. अहवालानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल. पीडितेसह आठ आयआयटी विद्यार्थी खुंटीत इंटर्नशिपसाठी इतर राज्यांतून आले होते. प्राथमिक तपासात विद्यार्थिनीचा आरोप खरा असल्याचे निष्पन्न झाले.