मोबाईल चोराचा महिलेनेच केला पाठलाग आणि आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 15:45 IST2018-11-15T15:42:57+5:302018-11-15T15:45:52+5:30
या चोरट्याकडून महिलेचा १५ हजार रुपयांचा महागडा मोबाईल जप्त करून महिलेला परत देण्यात आला आहे.

मोबाईल चोराचा महिलेनेच केला पाठलाग आणि आवळल्या मुसक्या
मुंबई - रेल्वे प्रवासादरम्यान हातातील मोबाईल हिसकावून पळणार्या एका चोरट्याला एका महिलेने पाठलाग करून चांगलाच इंगा दाखवला आहे. तिने पोलिसांच्या मदतीने त्या चोरट्याला जेरबंद केले आहे. किरण रमेश तामरकर (वय १९) असे या आरोपीचे नाव असून ठाण्याच्या गोपाळनगर परिसरात तो राहतो. या प्रकरणाचा अधिक तपास कुर्ला लोहमार्ग पोलीस करत आहेत. हे नाट्य मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकात घडले. या चोरट्याकडून महिलेचा १५ हजार रुपयांचा महागडा मोबाईल जप्त करून महिलेला परत देण्यात आला आहे.
कल्याण येथील संतोषी माता मंदिर परिसरात राहणार्या लक्ष्मी हिरा सिंग राजपूत (वय २५) हि महिला कल्याणहून कांजूरमार्गच्या दिशेने प्रवास करत होत्या. या प्रवासादरम्यान कांजूरमार्ग स्थानकात उतरताच त्यांच्या हातात असणारा हॉनर कंपनीचा १५ हजार रुपये किंमतीचा महागडा मोबाईल घेऊन चोराने पळ काढला होता. नंतर महिलेने ‘चोर चोर’ असा आरडा-ओरडा करत त्याचा पाठलाग करायला सुरूवात केली. तब्बल पाच मिनिटे त्या चोराच्या मागे धावत होत्या. त्यांच्या ओरडण्याच्या आवाज ऐकून स्थानकात असणारे आरपीएफचे जवानसुद्धा त्या चोराच्या मागे धावू लागले. कर्तव्यावर तैनात असणारे आरपीएफचे जवान सुमीत कुमार आणि रवीशंकर सिंगसोबत महाराष्ट्र सुरक्षा बलातील कर्मचार्यांनी प्लॅटफॉर्ममधून बाहेर पडताना या चोरट्याला घेराव घातला आणि पकडले.