निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 18:11 IST2025-08-06T18:09:51+5:302025-08-06T18:11:47+5:30
wife kill herself after husband torture: एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असलेल्या अनुरागची पत्नी मधुने मृत्यूला कवटाळले.

निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या मधूने लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यानंतर स्वतःचे आयुष्य संपवले. तिचा नवरा अनुराग मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी आहे. अनुराग आपल्याला नग्न करून मारहाण करतो, त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये जाऊन भेटतो, संबंध ठेवतो. अशा सगळ्या त्रासाला कंटाळून मधूने गळफास घेऊन स्वतःला संपवले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ही घटना घडली आहे. लखनौतील एका उच्चभ्रू वस्तीत अपार्टमेंटमध्ये अनुराग आणि मधू राहत होते. आत्महत्या केलेल्या मधुच्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मधूची मोठी बहीण प्रियाने सांगितले की, अनुराग खूप रागीट आणि हिंसक स्वभावाचा आहे. तो छोट्या छोट्या गोष्टींवर मधुला मारहाण करायचा. अगदी एखादी वस्तू इकडची तिकडे ठेवल्यावरूनही मारायचा. तो तिला बळजबरी दारू पाजण्याचा प्रयत्न करायचा. त्याने मधूचे मित्रमैत्रिणींसोबतच बोलणं पूर्णपणे बंद करून टाकलं होतं.
लग्नानंतर १५ दिवसांनी मधुला मारहाण
मधू आणि अनुरागचं याचवर्षी २५ फेब्रुवारी रोजी लग्न झालं होतं. लग्नानंतर १५ दिवसांनीच त्याने तिला मारहाण करायला सुरूवात केली. अनुरागने मारहाण केल्यामुळे मधु माहेरी निघून आली होती. रडतच तिने झालेला सगळा प्रकार तिच्या बहिणीला सांगितला होता.
मधुच्या कुटुंबीयांनी सांगितले की, अनुरागचे स्थळ मॅट्रिमोनियल साईटवरून आले होते. लग्नावेळी अनुरागने मधुच्या वडिलांकडे १५ लाख रुपये रोख आणि इतर महागड्या वस्तू मागितल्या होत्या. लग्नात मधुच्या तिच्या घरच्यांनी भरपूर खर्च केला पण, अनुरागच्या मागण्या मात्र सुरूच राहिल्या.
पोलिसांना सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, रविवारी (३ ऑगस्ट) रात्री मधू आणि अनुराग रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घरी आले होते. त्यावेळी ते भांडतच फ्लॅटमध्ये गेले होते. बऱ्याचदा घराबाहेर ते भांडताना दिसायचे.
एक्स गर्लफ्रेंडसोबत अनुरागचे संबंध
मधुच्या बहिणीने सांगितले की, अनुराग लग्नानंतरही त्याच्या पूर्वीच्या गर्लफ्रेंडच्या संपर्कात होता. तो तिला हॉटेलमध्ये भेटला. हे मधुला कळलं. तिने त्याला याबद्दल विचारलं तेव्हा अनुरागने तिच्याच चारित्र्यावर संशय घेतला. मधुने अनुराग आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडमधील चॅट्सचे स्क्रीनशॉट पुरावा म्हणून घरच्यांना पाठवून ठेवले होते.
मधुच्या कुटुंबीयांनी सांगितले की, अनुराग तिला निर्वस्त्र करून मारहाण करायचा आणि वडिलांकडून वेगवेगळ्या वस्तू आणण्याची मागणी करायचा. या सगळ्यांना कंटाळून तिने आत्महत्या केली. रविवारी रात्री मधुने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनुरागने सुरक्षा रक्षकाला मधुने आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर स्वतःच तिचा मृतदेह खाली उतरवला. १२ वाजता त्याने पोलिसांना याची माहिती दिली. तर मधुच्या कुटुंबीयांना तिने आत्महत्या केल्यानंतर ५ तासांनी याची माहिती मिळाली.