मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:41 IST2025-08-09T15:40:33+5:302025-08-09T15:41:09+5:30
या प्रकरणात आरोपी पतीला अटक झाली असून पोलीस घटनेतील प्रत्येक अँगलवर तपास करत आहेत.

मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
लखनौ - शहरातील गोल्फ सिटी इथल्या इमारतीत राहणाऱ्या मधु सिंह हिचा काही दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी पती अनुराग सिंह जे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते त्यांना अटक करून जेलमध्ये पाठवले. पोलिसांच्या चौकशीत आरोपी पतीने पत्नीला मृत्यूपूर्वी मारहाण केल्याची कबुली दिली होती. मधुचं लग्न अनुराग सिंहसोबत २५ फेब्रुवारीला झाले होते. मात्र लग्नाच्या १५ दिवसानंतरच पती अनुरागकडून पत्नी मधुला मारहाण करण्याचे प्रकार घडले होते. मधुने सुरुवातीला या घटना माहेरच्यांपासून लपवून ठेवल्या परंतु अत्याचार वाढले तेव्हा त्याची माहिती घरच्यांना दिली.
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप
ही घटना समोर आल्यानंतर मृत महिलेच्या कुटुंबाने आरोप लावला की, हुंड्याची मागणी करत पतीकडून सतत पत्नीला मारहाण केली जात होती. आता आमची मुलगी राहिली नाही, पण दोषीला शिक्षा द्या अशी मागणी केली. आता या प्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. ज्यात अनुरागची एक प्रेयसीही होती, जिच्यासोबत काही दिवसांपूर्वी त्याची भेट झाली होती. मधुने या गोष्टीचा विरोध केला म्हणून तिला मारहाण करण्यात आली होती. इतकेच नाही तर तिच्यावर संशयाचे आरोप केले होते. मधुला तिच्या नातेवाईकांशी आणि मित्रांसोबतही बोलण्यावर निर्बंध घातले होते.
पोलीस करतायेत प्रकरणाचा तपास
या प्रकरणात आरोपी पतीला अटक झाली असून पोलीस घटनेतील प्रत्येक अँगलवर तपास करत आहेत. या तपासात पुढे काय काय गुपित उघड होते हे पाहणे गरजेचे आहे. पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच मधुने आत्महत्या का केली, तिला कुणी उकसावले होते का यासारख्या विविध प्रश्नांची उत्तरे मिळतील. उत्तर प्रदेशात मागील काही दिवसांपासून पती-पत्नी वादाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सामाजिक संतुलन बिघडतेय का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
दरम्यान, आत्महत्येपूर्वी मधु गर्भवती होती त्यावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे असे अनुरागने पोलिसांकडे कबूल केले आहे. ३ ऑगस्टच्या रात्री त्याने मधुचा गळा दाबून खून केला त्यानंतर त्याला आत्महत्येचा बनाव रचला असं चौकशीत समोर आले. अनुरागच्या स्वभावाला मधु वैतागली होती. मधुकडे नोकरी नव्हती. त्यामुळे तिला सगळं सहन करावे लागत होते. नोकरी मिळाल्यानंतर ती अनुरागपासून वेगळे राहणार होती पण त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असं मधुच्या मैत्रिणींनी सांगितले.