पाण्याच्या वादातून सोसायटीच्या सदस्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 18:44 IST2021-10-11T18:28:31+5:302021-10-11T18:44:09+5:30
Assaulting Case : मोहन सबर्बिया संकुलात मागील ३ दिवसांपासून पाणी आलेले नसल्याने रहिवाशांमध्ये संताप होता.

पाण्याच्या वादातून सोसायटीच्या सदस्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला हल्ला
अंबरनाथ : सोसायटीच्या पाण्याच्या वादातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने सोसायटीच्या सदस्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन सबर्बिया या उच्चभ्रू गृहसंकुलात ही घटना घडली आहे. मारण्याचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
अंबरनाथ शहरात मागील काही दिवसांपासून पाण्याची टंचाई सुरू आहे. मोहन सबर्बिया संकुलात मागील ३ दिवसांपासून पाणी आलेले नसल्याने रहिवाशांमध्ये संताप होता. त्यातच आज सकाळी पाण्याचा टँकर आल्यानंतर सोसायटीतील रहिवाशी राकेश पाटील आणि याच संकुलातील एका सोसायटीचे अध्यक्ष असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी कृष्णा रसाळ पाटील यांच्यात वाद झाले. यानंतर कृष्णा रसाळ यांनी त्यांची दोन मुलं केवल रसाळ आणि आशुतोष रसाळ यांच्यासह आपल्याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप राकेश पाटील यांनी केला आहे. या मारहाणीत राकेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात संध्याकाळी उशिरापर्यंत परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. राकेश पाटील एकटे असताना पाच ते सहा जणांनी मिळून राकेश यांना मारहाण केल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही ताब्यात घेतले असून नेमकी चूक कोणाची होती हे सीसीटीव्ही च्या चित्रीकरणात स्पष्ट दिसत आहे.