उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील जानी पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका महिलेने आणि तिच्या मुलीने त्यांच्या बॉयफ्रेंडसह पतीची हत्या केली. ही घटना २३ जून रोजी घडली, जेव्हा शेतकरी सुभाषची शेतात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी केलेली सखोल चौकशी आणि कॉल डिटेल तपासानंतर १४ दिवसांनी या घटनेचा पर्दाफाश झाला आहे.
तपासात असं दिसून आलं की, सुभाषची मोठी मुलगी डॉली हिने काही महिन्यांपूर्वी स्वतःच्या मर्जीने एका तरुणाशी लग्न केलं होतं. आता त्याची पत्नी कविता हिचे देखील त्याच गावातील गुलजार या व्यक्तीशी संबंध होते. तसेच मुलगी सोनम हिचे मेरठमधील विपिन या तरुणाशी प्रेमसंबंध होते. सुभाषचा दोघींनाही कंटाळा आला होता. आई आणि मुलीला त्यांच्या बॉयफ्रेंडशी लग्न करायचं होतं, परंतु सुभाष त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा होता. म्हणूनच त्यांनी त्याला मारण्याचा कट रचला.
मुलगी सोनमला जेव्हा आईच्या प्रेमसंबंधांबद्दल कळलं तेव्हा तिने तिच्या आईला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिने धमकी दिली की, जर तिचं लग्न विपिनशी झालं नाही तर ती तिच्या आईच्या प्रेमाबद्दल सर्वांना सांगेल. या दबावाखाली दोघींनीही त्यांच्या बॉयफ्रेंडसह हत्येचा कट रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कविता आणि सोनमने सुभाषला मारण्यासाठी त्यांच्या बॉयफ्रेंडना तयार केलं.
२३ जून रोजी सुभाष शेतात पाणी देण्यासाठी गेला तेव्हा कविता आणि सोनमने व्हॉट्सअॅप कॉलद्वारे विपिनला माहिती दिली. विपिनने त्याच्या मित्राला शेताजवळ आणलं आणि त्याच्या मदतीने सुभाषवर गोळी झाडली. जखमी झालेला सुभाषने तेथून जाणाऱ्या एका तरुणाची मदत मागितली आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
हत्येनंतर कविता आणि सोनम सामान्य जीवन जगत होते. लोकांसमोर दुःख व्यक्त करत होते. पण जेव्हा पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि लोकेशनची चौकशी सुरू केली तेव्हा संपूर्ण प्रकार उघड झाला. पोलिसांनी मोबाईल डेटा शोधला तेव्हा त्यांना आढळलं की हत्येच्या दिवशी विपिन आणि त्याच्या मित्राचं तेच लोकेशन होतं. सोनम, कविता, विपिन आणि गुलजार यांच्यात व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक कॉल आणि चॅट सतत सुरू होते.
एका चॅटमध्ये विपिनने "डार्लिंग... काम झालं" असं सोनमला म्हटलं. त्यावर सोनमने "मी पप्पांसोबत चुकीचं केलं" असं म्हटलं आहे. एसपी ग्रामीण डॉ. राकेश कुमार मिश्रा म्हणाले की, सुभाषच्या हत्येप्रकरणी चार पोलीस पथकांनी सतत तपास केला आणि पाचही आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये पत्नी कविता, मुलगी सोनम, गुलजार, विपिन आणि विपिनच्या मित्राचा समावेश आहे.