Mayor Murder : महापौराची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, कटीहार शहरात तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 15:18 IST2021-07-30T15:03:48+5:302021-07-30T15:18:01+5:30
Mayor Murder : महापौर शिवराज यांना तात्काळ केएमसीएच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांनी आपली जीव सोडला होता. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून अद्याप काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

Mayor Murder : महापौराची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, कटीहार शहरात तणाव
पाटणा - बिहारमधील कटीहार येथे चक्क महापौरांचीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं कटीहारसह शेजारील जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिवराज पासवान असे मृत्यू झालेल्या नेत्याचं नाव असून ते राहत असलेल्या संतोष कॉलनी परिसरातच ही घटना घडली आहे. दुचाकीवर आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांना पाहताच गोळीबार सुरू केला. त्यामध्ये, 3 गोळ्या त्यांच्या छातीवर लागल्या आहेत. या घटनेनंतर शहरात मोठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महापौर शिवराज यांना तात्काळ केएमसीएच रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांनी आपली जीव सोडला होता. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून अद्याप काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सध्या तपास सुरू आहे, एवढेच उत्तर पोलिसांनी दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी महापौर मंदिरात जाण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. त्याचवेळी, काही अज्ञान युवकांनी समोर येऊन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर, ते घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. अद्यापही आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
महापौरांना गोळी लागल्याचे समजताच मोठ्या संख्येने नागरिक हुजूम मेडिकल कॉलेजला पोहोचले होते. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईक आणि समर्थकांनी केली. त्यावेळी, समोरील गर्दीची समजूत काढत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला. तसेच, आरोपींना पकडण्याचे आश्वासनही पोलिसांनी दिले आहे. दरम्यान, लोजपाचे नेते आणि रामविलास पासवान यांचे सुपुत्र चिराग पासवान यांनी काही दिवसांपूर्वी शिवराज यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तर, 26 मार्च 2021 रोजीच त्यांची महापौरपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळेच, राजकीय वादातून ही हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.