आत्मा भटकू नये म्हणून लग्न करतोय; दोघेही एकत्र हे जग सोडून गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 08:27 IST2022-07-05T08:27:07+5:302022-07-05T08:27:33+5:30
कांदिवलीतील मालकीण हत्या प्रकरण

आत्मा भटकू नये म्हणून लग्न करतोय; दोघेही एकत्र हे जग सोडून गेले
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : कांदिवलीच्या दळवी इमारतीत घडलेल्या हत्याकांडात सोमवारी एका नवा खुलासा झाला आहे. ज्यात मयत शिवदयाल सेन (६०) याने आत्महत्येपूर्वी भूमी दळवी (१७) हिच्याशी विवाह केला होता. त्याच्या सुसाईड नोटमध्ये तसा उल्लेख असल्याचे सूत्रांचे म्हणणे असून, कुमारिका मुलीचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास तिची आत्मा भटकत राहते, असा समज असल्याने त्याने विधी केल्याचीही माहिती असून, बळीचा प्रकार नसल्याचे उघड झाले आहे.
सेनकडे सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘आय लव्ह बेबी (भूमी) व्हेरी मच’ असा उल्लेख आहे. मात्र, सेन हा भूमीवर त्याच्या नातीप्रमाणे प्रेम करत होता. मात्र, किरणच्या बाहेरख्याली पणाला सेन आणि भूमी हे दोघे कंटाळले होते. त्याच्या मालकाच्या बाबतीत तिचे वागणे त्याला आवडत नव्हते. त्याच्या सुसाईड नोटमध्ये त्याने आशिष दळवी यांना उद्देशून ‘भय्याजी, मे आपको इन लोगो के टेन्शन से मुक्ती दे रहा हू,’ असे लिहिले आहे. तर भूमीच्या नोटमध्ये ‘पापा, मैं आप से प्यार करती हू और आपको टेन्शन मे देख नही सकती, इसी लिये शिव अंकल के साथ मिलकर मैने ये किया,’ आपने मेरे लिये बोहोत किया है, इसी लिये अब माई आपको सारी जिम्मेदारियो से मुक्त करती हु,’ असे लिहिल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.
गणपतीच्या फोटोला समोर ठेवत सेन याने भूमीशी लग्न केले. मात्र, यामागे त्याचा शारीरिक सुखाचा उद्देश नसून कुमारिकेचा मृत्यू जर अनैसर्गिक असेल तर तिच्या आत्म्याला मुक्ती न मिळता तो भटकत राहतो, असा समज होता. त्यामुळे त्याने तिच्याशी लग्नाचे विधी मी करत असून, दोघेही एकत्र हे जग सोडून जात असल्याचेही म्हटले आहे. तसेच ‘मी गेल्यावर माझ्या वडिलांना त्रास देऊ नका,’ असे पोलिसांना सांगितले आहे. त्यांच्या सुसाईड नोट वाचल्यानंतर आशिष यांना जबर धक्का बसला असून, ते सध्या काहीच बोलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी फक्त त्यांची माहिती घेऊन त्यांना अंत्यसंस्कारासाठी इंदोरला जाण्याची परवानगी दिली आहे.