६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 05:56 IST2025-09-24T05:55:49+5:302025-09-24T05:56:14+5:30
पती, सासू, सासरे आणि नणंदेने तिचा छळ करण्यास सुरुवात केली. पतीच्या व्यवसायासाठी ६ कोटी रुपये आणण्यासाठी तिच्या मागे तगादा लावण्यात आला.

६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
मुंबई : तब्बल ६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त हुंड्यासाठी विवाहित तरुणीचा छळ केल्याची धक्कादायक घटना माहीम परिसरात उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या मारहाणीत या महिलेचा गर्भपात झाला. पीडितेने पोलिसांत धाव घेतली असून माहीम पोलिसांनी पतीसह सासू, सासरे आणि नणंदेवर गुन्हे दाखल केले आहेत.
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये माहीम येथे राहणाऱ्या लाकडाच्या व्यापाऱ्याशी तक्रारदार तरुणीचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. वडिलांनी हुंड्यापोटी ११ लाख रुपये रोख, १६५ तोळे सोने, २ किलो चांदी, एक कार आणि इस्लाम जिमखाना येथे तब्बल तीन कोटी रुपये खर्च करून अक्षरश: डोळे दीपवणारा विवाह सोहळा आयोजित केला होता. याशिवाय, सासरच्या मंडळींनी २१ लाख रुपयांची बीएमडब्ल्यू कार हुंड्यापोटी मागितली होती. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेले. मात्र नंतर पती, सासू, सासरे आणि नणंदेने तिचा छळ करण्यास सुरुवात केली. पतीच्या व्यवसायासाठी ६ कोटी रुपये आणण्यासाठी तिच्या मागे तगादा लावण्यात आला.
गर्भपातासाठी पोटात लाथा मारल्या
हे अनन्वित अत्याचार सहन करत असतानाच ही तरुणी गर्भवती राहिली. मात्र, ही गोष्ट लक्षात येताच तिच्यावर गर्भपातासाठी दबाव आणण्यास सुरुवात झाली. या छळाला विरोध करताच पतीने तिला अमानुषपणे मारहाण करत तिच्या पोटात अक्षरश: लाथा मारल्या, त्यामुळे ती गंभीर जखमी झाली आणि अखेर तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तिला घराबाहेर काढण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी माहीम पोलिस ठाण्यात १८ सप्टेंबर रोजी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार पती, सासू, सासरे आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.