माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 23:00 IST2025-12-18T22:56:47+5:302025-12-18T23:00:10+5:30
Manikrao Kokate Arrest Updates: लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून कोकाटे यांच्या अटकेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
Manikrao Kokate Arrest Updates: शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आजच रात्री अटक केली जाऊ शकते. त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून अटकेची टांगती तलवार होती. अखेर आज त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. नाशिकपोलिसांचे पथक वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाले. नाशिक पोलिस दलातून सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके हे पथकप्रमुख असून गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल तसेच अधिकारी, कर्मचारी यांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद करून हे पथक लिलावती रुग्णालयात धडकणार आहे. माणिकराव कोकाटे काल दुपारी लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून कोकाटे यांच्या अटकेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
अटकेच्या प्रक्रियेला गती
मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट निघाल्याप्रकरणी नाशिक पोलिसांची एकूण १३ जणांची टीम मुंबईत दाखल झाली असल्याचे सांगितले जात आहे. या पथकात सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, वरिष्ठ अधिकारी आणि १० हवालदार असे १३ जण आहेत. बुधवारी रात्री नऊनंतर नाशिक पोलिसांची टीम मुलुंड टोलनाका मार्गाने मुंबईत दाखल झाली. तिथून ही टीम वांद्रे पोलिस ठाण्यात पोहोचली असून तेथून पुढे लिलावती रुग्णालयामध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पुढे कारवाई
नाशिक पोलिसांकडून कारवाईपूर्वी कोकाटे यांचा सध्याचा वैद्यकिय अहवाल पाहून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन पोलिस पुढे कारवाई करण्याबाबत निर्णय घेतील. शिवाय कारवाईपूर्वी नाशिक पोलिस वांद्रे पोलिसांना याबाबत कळवू शकतात. मात्र, न्यायालयाचे आदेश असल्याने मुंबई पोलिसांना कळवणे तसे बंधनकारक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र कोकाटेंवर कारवाईपूर्वी वैद्यकिय अहवाल आणि तज्ञ डॉक्टरांच्या सल्यानुसार पुढील कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.