नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 06:11 IST2025-12-27T06:10:54+5:302025-12-27T06:11:18+5:30
मंगेश काळोखे मुलीला शाळेत सोडून घरी परत येत असताना त्यांना त्यांच्या घराजवळ चार ते पाच जणांनी वाहनाने उडवले. त्यानंतर काळोखे जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्यांचा पाठलाग करून मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.

नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार
लोकमत न्यूज नेटवर्क
खोपोली : येथील शिंदेसेनेच्या प्रभाग क्रमांक दोनमधील नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे (वय ४५) यांची शुक्रवारी चार ते पाच जणांनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. निवडणूक निकालानंतर अशा प्रकारे राजकीय हत्या होण्याची ही रायगड जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. हा प्रकार सकाळी ६.४५ च्या सुमारास रहाटवडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला.
मंगेश काळोखे मुलीला शाळेत सोडून घरी परत येत असताना त्यांना त्यांच्या घराजवळ चार ते पाच जणांनी वाहनाने उडवले. त्यानंतर काळोखे जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्यांचा पाठलाग करून मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर विहारी गाव परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. आरोपींना ताब्यात दिल्याशिवाय काळोखे यांचा मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका काळोखे यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली. परंतु, पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी समजूत घातली. त्यानंतर काळोखे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
मंगेश काळोखे यांची हत्या करण्याचा कट राष्ट्रवादी (अजित पवार) चे नेते व विरोधातील उमेदवाराच्या नातेवाईकांनी रचल्याची तक्रार पुतणे राज काळोखे यांनी पाेलिसांत दिली आहे.
कार्यकर्त्यांचे पोलिस ठाणे परिसरात ठाण; बाजारपेठ बंद
या घटनेच्या निषेधार्थ खोपोली बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल याही खोपोलीत दाखल झाल्या. परंतु, आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत पोलिस ठाणे सोडणार नाही, अशी भूमिका काळोखे यांच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी पोलिस स्टेशनला घेराव घातला. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दरम्यान. पोलिसांची वेगवेगळी पथके आरोपींचा शोध घेत असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात आणि पोलिस ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.