सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 09:50 IST2026-01-01T09:49:22+5:302026-01-01T09:50:05+5:30
Mandsaur Triple Murder: बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास गोळीबाराच्या आवाजाने गोल चौराहा परिसर हादरून गेला. स्थानिक नागरिक जमा झाले असता त्यांना सुवर्ण व्यावसायिकाच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात तीन मृतदेह पडलेले दिसले.

सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
मंदसौर (मध्य प्रदेश): नवीन वर्षाचे स्वागत सुरू असतानाच मध्य प्रदेशातील मंदसौर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. शहरातील गोल चौराहा परिसरात एका सुवर्ण व्यावसायिकाच्या घरात तिघांची गोळ्या झाडून आणि वार करून हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये सुवर्ण व्यावसायिक, त्यांची पत्नी आणि एका तिसऱ्या व्यक्तीचा समावेश आहे.
बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास गोळीबाराच्या आवाजाने गोल चौराहा परिसर हादरून गेला. स्थानिक नागरिक जमा झाले असता त्यांना सुवर्ण व्यावसायिकाच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात तीन मृतदेह पडलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विनोद कुमार मीना यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून एक पिस्तूल आणि चाकू जप्त करण्यात आला आहे. मृतांमध्ये सुवर्ण व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीची ओळख पटली आहे, तर तिसरी व्यक्ती कोण आहे आणि त्याचा काय संबंध आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या त्यांच्यातील वादातून किंवा पूर्ववैमनस्यातून झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलीस तपास सुरू पोलीस अधीक्षक विनोद कुमार मीना यांनी सांगितले की, "तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि वेळ स्पष्ट होईल. आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक साक्षीदारांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहोत."