भयंकर... पत्नीचा गळा कापून 'भारत माता की जय'च्या घोषणा; शिर हातात घेऊन गाठलं पोलीस ठाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 23:27 IST2020-02-01T22:58:50+5:302020-02-01T23:27:02+5:30

धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत

man goes to police station with head of wife after killing her in barabanki uttar pradesh | भयंकर... पत्नीचा गळा कापून 'भारत माता की जय'च्या घोषणा; शिर हातात घेऊन गाठलं पोलीस ठाणं

भयंकर... पत्नीचा गळा कापून 'भारत माता की जय'च्या घोषणा; शिर हातात घेऊन गाठलं पोलीस ठाणं

बाराबांकी: उत्तर प्रदेशातल्या बाराबांकीमध्ये एका तरुणानं त्याच्या पत्नीची हत्या केली. पत्नीचं कापलेलं शीर घेऊन तरुण पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत त्याची रवानगी तुरुंगात केली. जहांगीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बहादूरपूर गावात हा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 

बहादूरपूरमध्ये राहणाऱ्या तरुणानं त्याच्या पत्नीचं शीर कापलं. ते शीर हातात घेऊन राष्ट्रगीत म्हणत तो पोलीस ठाण्याच्या दिशेनं चालू लागला. राष्ट्रगीत म्हटल्यानंतर तरुणानं भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणानं त्याच्या पत्नीला खेचून घराबाहेर काढलं. यानंतर कोयत्यानं तिचा गळा कापला. पत्नीचं शीर हातात घेऊन तरुण जहागीराबाद पोलीस ठाण्याच्या दिशेनं जात असताना मोठी गर्दी जमली होती. 

पोलीस अधीक्षक डॉ. अरविंद चतुर्वेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीची हत्या करणाऱ्या तरुणाचं नाव अखिलेश असून दोनच वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याला एक मुलगी होती. मात्र एका आजारात तिचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास अखिलेशचं त्याची पत्नी रंजना सोबत भांडण झालं. 

वाद विकोपाला गेल्यावर अखिलेशनं रंजनाला मारहाण करत घराबाहेर काढलं. एका धारदार कोयत्यानं त्यानं तिचं शीर धडावेगळं केलं. यानंतर तो जहागीराबाद पोलीस ठाण्याच्या दिशेनं चालू लागला. पत्नीचं शीर हातात घेऊन निघालेल्या अखिलेशच्या मागे मोठी गर्दी जमा झाली होती. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा असून परिसरात भीतीचं वातावरण आहे. 
 

Web Title: man goes to police station with head of wife after killing her in barabanki uttar pradesh