बनावट बँक उघडली, गावकऱ्यांना फसवले अन् ६० लाख रुपये घेऊन पळ काढला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:09 IST2025-01-06T12:39:55+5:302025-01-06T13:09:51+5:30
बनावट बँक स्थापन करून लोकांची फसवणूक करण्याचे हे नवीन प्रकरण जांजगीरच्या नवगढ पोलीस स्टेशन भागातील आहे.

बनावट बँक उघडली, गावकऱ्यांना फसवले अन् ६० लाख रुपये घेऊन पळ काढला!
सध्या फसवणुकीचे प्रकार दिसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. फसवणूक करणारे इतके हुशार झाले आहेत की, ते निष्पाप लोकांना सहज लक्ष्य करतात. अशातच आता छत्तीसगडच्या जांजगीरमधून एक नवीन प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एका व्यक्तीने स्वतः बनावट बँक तयार केली. यानंतर लोकांनी त्या बँकेत पैसे जमा केले. ज्यावेळी या बनावट बँकेत ५० ते ६० लाख रुपये जमा झाले, त्यावेळी या व्यक्तीने सर्वांचे पैसे घेऊन पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
बनावट बँक स्थापन करून लोकांची फसवणूक करण्याचे हे नवीन प्रकरण जांजगीरच्या नवगढ पोलीस स्टेशन भागातील आहे. याठिकाणी कमलेश देवगण नावाच्या फिर्यादीने तक्रार दाखल करताना सांगितले होते की, मुख्तार अली नावाचा एक व्यक्ती आणि त्याचा मुलगा आमोदा गावात किराणा दुकान चालवायचे. यासोबतच हे दोघेही ऑनलाइन व्यवहार करायचे. बराच वेळ दुकान चालवल्यानंतर दोघांनी स्वतःची बँक काढली.
मुख्तार अली आणि त्याच्या मुलाने एरिऑल्ड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड अमोदा, अशा नावाने बँक स्थापन केली. या बँकेत पैसे जमा केल्यास ग्राहकांना दरमहा एक किंवा दोन टक्के व्याज दिले जाईल, असे त्यांनी लोकांना सांगितले. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि बँकेत पैसे जमा करायला सुरुवात केली. ते हप्त्याने लोकांचे पैसे बँकेत जमा करत होते. यानंतर त्यांच्या बँकेत चांगली रक्कम जमा होऊ लागली.
तक्रारदार कमलेश देवगण यांनी सांगितले की, त्यांनी स्वत: मुख्तार आणि त्याच्या मुलाच्या बँकेत २४ हप्त्यांमध्ये तीन वर्षांत २३ लाख रुपये जमा केले. कमलेश देवगण यांच्याव्यतिरिक्त गावातील इतर लोकांनीही एरिऑल्ड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड अमोदा, या बँकेत पैसे जमा केले होते. गावातील २० ते २५ लोकांनी या बँकेत जवळपास ५० ते ६० लाख रुपये जमा केले होते. हे सर्व पैसे घेऊन मुख्तार अली आणि त्याचा मुलगा पळून गेला. परंतु तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला रायपूर येथून अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.