माझ्यावर गुन्हा कसा दाखल करता? ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये पकडलेल्या तरुणाने स्वतःला पेटवून दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:01 IST2025-07-30T16:00:52+5:302025-07-30T16:01:52+5:30

तेलंगणात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर एका व्यक्तीने पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून दिलं.

Man caught driving under the influence of alcohol sets himself on fire at Nalgonda police station | माझ्यावर गुन्हा कसा दाखल करता? ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये पकडलेल्या तरुणाने स्वतःला पेटवून दिलं

माझ्यावर गुन्हा कसा दाखल करता? ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये पकडलेल्या तरुणाने स्वतःला पेटवून दिलं

Telagana Crime: तेलंगणामध्ये एका व्यक्तीने पोलीस ठाण्यासमोरच स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने पोली ठाण्याच्या आवारातच एका पोलिस अधिकाऱ्यासमोर स्वतःवर पेट्रोल ओतून घेतलं आणि त्यानंतर पेटवून घेताना दिसत आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून माथेफिरुने हा सगळा प्रकार केल्याचे समोर आलं आहे. तरुणाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील या व्यक्तीविरुद्ध दारू पिऊन गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्याने संतापाच्या भरात पोलीस ठाण्यात स्वतःला पेटवून घेतले. रविल्ला नरसिंह असे या व्यक्तीचे नाव आहे. तो दारू पिऊन गाडीवरुन घरी परतत असताना ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाई दरम्यान पकडला गेला. तपासणीनंतर, नालगोंडा १-टाउन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या कारवाईमुळे नाराज झालेल्या नरसिंहने पोलिस ठाण्याच्या आवारात स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले आणि माझ्यावर गुन्हा दाखल करणार का?" असं ओरडू लागला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सोमवारी रात्री नलगोंडा शहरात ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरु होती. त्यावेळी बाईकवर असलेल्या नरसिंहला थांबवण्यात आले आणि त्याची चाचणी करण्यात आली. चाचणीत त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण १५५ मिलीग्राम/१०० मिली असल्याचे आढळून आले, जे मर्यादेपेक्षा खूपच जास्त होते. त्यानंतर पोलिसांनी त्याची गाडी जप्त केली. तितक्यात नरसिंहने पोलिस अधिकाऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली दारूच्या नशेत असलेल्या नरसिंहाने पोलीस अधिकाऱ्यांवर ओरडण्यास सुरुवात केली. माझ्याविरुद्ध गुन्हा कसा दाखल करु शकता असं तो ओरडायला लागला. त्यानंतर त्याने पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून दिलं. हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये रविल्ला नरसिंह जळत असताना त्याच्या समोर एक पोलिस अधिकारी उपस्थित होता. त्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आगीचा भडका उडाल्याने तो अधिकारी तिथून पळाला आणि पुढे जाऊन पडला. त्यानंतर दुसरा पोलीस कर्मचारी बाहेर आला आणि त्याने सर्व प्रकार पाहिला. तो कर्मचारी परत आत गेला आणि त्याने चादर घेऊन रविल्ला नरसिंहाकडे धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला.

नरसिंहाला भाजलेल्या अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाल्याचे समोर आलेलं नाही.

Web Title: Man caught driving under the influence of alcohol sets himself on fire at Nalgonda police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.