जेवायला घालून विश्वास जिंकला, बेशुद्ध केले अन्...; चांदीचे कडे चोरण्यासाठी महिलेचे दोन्ही पाय कापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:15 IST2025-10-15T16:13:47+5:302025-10-15T16:15:45+5:30
राजस्थानमध्ये दोन आरोपींनी महिलेच्या पायातील चांदीचे कडे चोरण्यासाठी मोठा कट रचला होता.

जेवायला घालून विश्वास जिंकला, बेशुद्ध केले अन्...; चांदीचे कडे चोरण्यासाठी महिलेचे दोन्ही पाय कापले
Rajasthan Crime: राजस्थानातील एका घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. चांदीच्या कड्यांसाठी एका वृद्ध महिलेचा जीव घेण्याचा प्रयत्न राजस्थानमध्ये झाला. सवाई माधोपूरमध्ये एका वृद्ध महिलेचा चांदीच्या कड्यांसाठी पाय कापण्यात आला.या घटनेनंतर महिला रस्त्याच्या कडेला वेदनेने व्हिवळत पडली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला. जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयात पीडित महिलेवर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या प्रकरणात एक महिला आणि एका पुरुषाला पाच तासात अटक केली.
राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये ६५ वर्षीय महिलेला नोकरीचे आमिष दाखवून गंगापूर शहर परिसरातील जंगलात नेण्यात आले होते. आरोपींनी महिलेचे दोन्ही पाय कापून तिचे १.५ किलो चांदीचे कडे चोरुन नेले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पीडित महिला, कमला देवी (६५), बामनवास परिसरातील रहिवासी आहेत. त्या बांधकाम प्रकल्पांमध्ये मजूर म्हणून काम करतात. ५ ऑक्टोबर रोजी एका अज्ञात तरुणाने त्यांशी संपर्क साधला आणि त्यांना गंगापूर शहरात काम देण्याचे आमिष दाखवले. ८ ऑक्टोबर रोजी त्याच तरुणाने कमला देवींना फोन करून गंगापूर शहरात बोलावले. कमला, तिची सून सीमा आणि आणखी एक महिला बुधवारी सकाळी गंगापूर शहरात पोहोचल्या.
कमला तिची सून सीमा आणि शेजारी उगतीसोबत गंगापूरला आली तेव्हा आरोपीने सीमा आणि उगतीला त्याच्या दुचाकीवर बसवून दुसरीकडे सोडले. आरोपीने सीमाला सांगितले होते की तो कमलाला घेऊन येईल. मात्र त्याने कमला यांना एका घरात नेले. त्यांना जेवणही दिलं. रात्री दोनच्या सुमारास आरोपींनी कमला यांना तोंड दाबून बेशुद्ध केलं. त्यांनतर दोन्ही आरोपींनी कमला यांचे पाय कापले आणि चांदीचे कडे घेऊन पळ काढला.
या घटनेनंतर कमला यांनी आरडाओरड केल्यावर शेजाऱ्यांनी धाव घेतली. पोलिसांना सकाळी ८ वाजता घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर कमला यांना सवाई माधोपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी रामोतर उर्फ कडू आणि त्याची मैत्रीण तनु उर्फ सोनिया पुजारी हिला अटक केली आहे. आरोपी रामोतर यापूर्वीही अशाच गुन्ह्यांमध्ये सहभागी होता आणि तो एक महिन्यापूर्वीच तुरुंगातून सुटला होता.