१०० रूपयांच्या वादात मित्राची हत्या करत केला आत्महत्येचा बनाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 23:06 IST2022-02-07T23:05:44+5:302022-02-07T23:06:31+5:30
Crime News : मृतदेह जाळुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, दहिसरमधील घटना

१०० रूपयांच्या वादात मित्राची हत्या करत केला आत्महत्येचा बनाव
मुंबई : मामे भावाचे १०० रुपये न देता त्याला शिविगाळ केल्याच्या रागात मित्रानेच गँरेजमधील प्लास्टिकच्या दोरीने ४ मित्राचा गळा आवळून हत्या केली. पुढे, मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून पेटवून देत आत्महत्येचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार दहिसर हत्या प्रकरणात समोर आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी परमेश्वर कोकाटेला अटक केली आहे. त्याला ५ दिवसांची पोलीस कोठड़ी सुनावण्यात आली आहे.
यामध्ये राजू पाटील याची हत्या करण्यात आली आहे. पाटील आणि कोकाटेमध्ये गेल्या ८ वर्षापासून मैत्री होती. मात्र, याच दरम्यान कोकाटेच्या मामे भावाकड़ून घेतलेले १०० रुपये न देता त्याला शिविगाळ केल्याच्या रागात दोघांमध्ये वाद खटके उडायला लागले. ते दहिसर येथील गँरेजमध्ये राहण्यास होते. ४ फेब्रुवाऱी रात्री साडे आठच्या सुमारास सोबत दारू प्यायल्यानंतर याच १०० रूपयांवरुन त्यांच्यात वाद झाले. कोकाटेने रागात त्याला खाली पाडले. गँरेजमधील प्लास्टिक दोरीने त्याचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर, तेथील काही कपड़े आणि ब्लकेटमध्ये त्याला गुंडाळून रात्री उशिराने पेटवून दिले. थोड्या वेळाने आग आग म्हणत.. पाटीलने आत्महत्या केल्याचा आरड़ा ओरडा सुरु केला.
स्थानिकांच्या मदतीने आग विझवत याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची वर्दी लागताच दहिसर पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत, शोध सुरु केला.
असा झाला उलगड़ा
ब्लकेटमध्ये स्वतःला गुंडाळून कोणी आत्महत्या कसे करू शकतो? यामुळे पोलिसांनी कोकाटेकड़े उलटतपासणी सुरु केली. सुरूवातीला तो मी नव्हेच म्हणणाऱ्या कोकाटेने अखेर, गुंह्यांची कबुली दिली. आणि वरील घटनाक्रम सांगितला.
५ दिवसांची कोठड़ी
याप्रकरणी आरोपीला अटक करत त्याला ५ दिवसांची कोठड़ी सुनावण्यात आली असून अधिक तपास सुरु असल्याचे दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितले.