१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 09:40 IST2025-11-05T09:35:55+5:302025-11-05T09:40:26+5:30
कोकेन जप्ती प्रकरणातील फरार आरोपी ऋषभ बैसोयाविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने इंटरपोल रेड नोटीस जारी केली आहे.

१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
Rishabh Baisoya Red Corner Notice: भारतातील सर्वात मोठ्या ड्रग्ज तस्करी प्रकरणांपैकी एक असलेल्या १३ हजार कोटी रुपयांच्या कोकेन जप्ती प्रकरणात, दिल्ली पोलीस विशेष कक्षाला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य फरारी आरोपी ऋषभ बैसोया याच्याविरोधात इंटरपोलने मंगळवारी रेड कॉर्नर नोटीस जारी केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षानुसार, ऋषभ कार्टेलच्या रसद आणि ड्रग्ज तस्करीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ बैसोया हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर टोळीचा म्होरक्या वीरेंद्र सिंग बैसोया (उर्फ वीरू) याचा मुलगा आहे. ऋषभ सध्या मध्य पूर्वेकडील देशांमध्ये लपून बसल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. भारतीय न्यायालयांनी यापूर्वीच त्याला फरारी म्हणून घोषित केले आहे. इंटरपोलच्या रेड नोटीसमुळे आता जगभरातील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या तपास यंत्रणा त्याला शोधून ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून त्याचे भारतात प्रत्यार्पण करता येईल.
इंटरपोलची रेड नोटीस हे आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट नसते. ही जगभरातील तपास यंत्रणांना केलेली एक विनंती असते. या विनंतीद्वारे, एखाद्या फरारी व्यक्तीला शोधून काढावे आणि तो ज्या देशात हवा आहे, त्या देशात प्रत्यार्पण होईपर्यंत त्याला ताब्यात घ्यावे, असे आवाहन केले जाते. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमधील ‘ट्रायल इन अब्सेंटिया’ या तरतुदीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या तरतुदीनुसार, जर घोषित गुन्हेगार आरोप निश्चित झाल्यानंतर ९० दिवसांपेक्षा जास्त काळ फरारी राहिला, तर त्याच्या अनुपस्थितीतही खटला चालवला जाऊ शकतो आणि त्याला दोषीही ठरवले जाऊ शकते.
कोण आहे ऋषभ बैसोया?
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ बैसोया हा त्याच्या वडिलांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी नेटवर्कसाठी वितरण आणि लॉजिस्टिक्सची जबाबदारी सांभाळत होता. त्याने बनावट कंपन्या आणि औषध वितरणाच्या नावाखाली कागदपत्रे वापरून भारतातील प्रमुख महानगरांमध्ये कोकेनचा साठा पोहोचवला. दिल्ली पोलीस विशेष कक्षाच्या माहितीनुसार, बैसोयाच्या नेटवर्कची पाळेमुळे दिल्ली, पंजाब, मुंबई, हैदराबाद आणि गोवा यांसारख्या शहरांमध्ये पसरली आहेत. या टोळीने हजारो कोटी रुपये परदेशातील खात्यांमध्ये आणि हवाला मार्गाने लाँडर केल्याचा संशय आहे.
ऋषभ बैसोयाने १ ऑक्टोबर २०२४ रोजी सहआरोपी जतिंदर सिंग गिल (उर्फ जस्सी) याला ड्रग्ज वाहतुकीसाठी टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्ही दिली होती. ५ ऑक्टोबर रोजी पंजाबमधील अजनाला येथे नेपाळ सीमेजवळ हे वाहन पकडण्यात आले, ज्यात सुमारे १ किलो कोकेन आणि मेफेड्रोन सापडले. सीसीटीव्ही फुटेजवरून बैसोया आणि गिल दिल्लीतील हुडको प्लेस आणि पंचशील एन्क्लेव्हमधील एका हॉटेलमध्ये एकत्र असल्याचे सिद्ध झाले. त्याच्यावर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायद्याच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल आहे.
कसे चालत होते आंतरराष्ट्रीय जाळे?
या टोळीने दक्षिण अमेरिकेतून दुबईमार्गे कोकेनची तस्करी भारतात केली. बनावट आयात कंपन्या, नकली औषध वितरक आणि कुरिअर सेवांचा वापर करून ते मालाची आणि पैशांची लपवाछपवी करत होते. या सिंडिकेटचे काम पाकिस्तान आणि दुबईतून पाहिले जात होते, आणि त्यांचे सदस्य थायलंड, मलेशिया आणि युनायटेड किंगडममध्ये सक्रिय होते.