Mainpuri Family Suicide Case: उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या १७ वर्षात एकाच कुटुंबातील १० जणांनी आत्महत्या केल्या आहेत. ताजी घटना शुक्रवारी घडली, ज्यात कुटुंबातील १८ वर्षीय जितेंद्रने झाडाला गळफास लावून आयुष्य संपवले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच महिन्यांत या कुटुंबात आत्महत्येची ही चौथी घटना आहे. २१ दिवसांपूर्वीच, जितेंद्रच्या काकांनीही आत्महत्या केली होती.
झाडाला लटकलेला मृतदेह...मैनपुरी जिल्ह्यातील बेवार पोलीस स्टेशन परिसरातील सकट बेवार गावातील रहिवासी हिरालाल यांचा नातून जितेंद्र याने गेल्या शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या कुटुंबात आत्महत्या करून आपले जीवन संपवण्याची ही सातवी घटना होती. हिरालाल यांनी सांगितले की, माझा नातू जितेंद्र सकाळी १० वाजता जेवण करुन शेतात गेला होता. त्याने सांगितले होते की, थोड्या वेळाने परत येईल. पण बराच वेळ तो परतला नाही, तेव्हा जितेंद्रचे वडील रामबरन त्याला शोधण्यासाठी शेतात गेले. दुपारी २ वाजता गावाबाहेर एका शेतात जितेंद्रचा मृतदेह फासावर लटकलेला असल्याची माहिती मिळाली.
...आणखी किती लोक मरणारमुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आई रडत घटनास्थळी पोहोचली. मुलाला पाहून आईने हंबरडा फोडला. 'अरे देवा, तू माझा मुलगा का घेऊन गेलास? काही दिवसांपूर्वी माझी मुलगीही मरण पावली. माझा मेहुणाही मरण पावला...आणखी किती लोक मरणार?' असे म्हणत ती बेशुद्ध पडली. लोकांनी तिला कसेबसे सांभाळले. विशेष म्हणजे, २१ दिवसांपूर्वीच जितेंद्रचे काका बलवंतने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जितेंद्रची सख्खी बहीण सौम्यानेही ४ महिन्यांपूर्वी घरात गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. तर, जितेंद्रचा चुलत भाऊ बाबा शेर सिंगनेही साडेचार महिन्यांपूर्वी गळफास घेतला होता.
तसेच, ५ वर्षांपूर्वी २०२० मध्ये काका मनीषने आणि ८ वर्षांपूर्वी २०१७ मध्ये जितेंद्रचा दुसरा काका पिंटूनेही स्वतःला पेटवून आत्महत्या केली होती. याशिवाय, १० वर्षांपूर्वी २०१५ मध्ये जितेंद्रचे काका संजू यांनीदेखील विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्याआधीही कुटुंबातील सुरजपाल, महिपाल आणि रामसिंग यांनीही आत्महत्या केल्या आहेत. गेल्या १७ वर्षांत कुटुंबातील १० जणांनी आत्महत्या करुन आयुष्य संपवले आहे.
गावकऱ्यांमध्ये दहशतएकाच कुटुंबात इतक्या लोकांनी आत्महत्या केल्याने गावातील लोकही घाबरले आहेत. काही ग्रामस्थांचा असा विश्वास आहे की, हिरालालच्या घरात भूतबाधा आहे, ज्यामुळे हे लोक आत्महत्या करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.