पतीच्या मृतदेहावर रडणारी पत्नीच निघाली मास्टरमाईंड; महाराष्ट्राच्या प्रियंकाने रचला भयंकर कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 10:12 IST2026-04-09T10:08:50+5:302026-04-09T10:12:36+5:30
'सोनम रघुवंशी' प्रकरणाची पुनरावृत्ती! पतीच्या हत्येनंतर रडण्याचं नाटक अन् १ लाखाची दिली सुपारी

पतीच्या मृतदेहावर रडणारी पत्नीच निघाली मास्टरमाईंड; महाराष्ट्राच्या प्रियंकाने रचला भयंकर कट
MP Crime: मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. आपल्या पतीच्या मृत्यूवर ढसाढसा रडणारी आणि दरोड्याचा बनाव रचणारी पत्नीच अखेर खरी एका मोठ्या कटाची सूत्रधार निघाल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली. प्रियकरासोबत संसार थाटण्यासाठी प्रियांका पुरोहित नावाच्या महिलेने आपल्या पतीचा म्हणजे देवकृष्ण पुरोहित याचा क्रूरपणे काटा काढला.
केवळ सहा तासांच्या तपासामध्येच पोलिसांनी त्या पत्नीचा खरा चेहरा उघड केला. पत्नीने आपल्या प्रियकराच्या संगनमताने या संपूर्ण गुन्ह्याचे नाट्य रचले होते. तपासादरम्यान, प्रियांका पुरोहित (२७) हिने आपला पती देवकृष्ण पुरोहित याचा काटा काढण्यासाठी तिचा प्रियकर कमलेश (३३) याच्यासोबत कट रचला होता. या कटाचाच एक भाग म्हणून, कमलेशने आपला साथीदार सुरेंद्रयाला हत्येची सुपारी म्हणून १,००,००० रुपये दिले होते आणि या संपूर्ण घटनेला लुटमारीचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी आधीच एक योजना आखली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे, तर हत्येची सुपारी घेणारा सुरेंद्र मात्र अद्याप फरार आहे.
७ एप्रिल २०२६ रोजी रात्री गोंदीखेडा चारण गावात देवकृष्ण पुरोहित यांची त्यांच्याच घरात हत्या झाली. सकाळी प्रियांकाने रडत रडत पोलिसांना सांगितले की, "रात्री काही अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसून आम्हाला ओलीस ठेवले. प्रतिकार केल्यावर त्यांनी पतीची हत्या केली आणि साडेतीन लाखांचे दागिने व ५० हजार रुपयांची रोकड लुटून नेली." सुरुवातीला पोलिसांनी लुटीचा गुन्हा दाखल केला, पण प्रियांकाच्या वागण्याने पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
असा उघड झाला बनाव
प्राथमिक अहवालानुसार असं वाटत होतं की, काही घुसखोरांनी घरात प्रवेश केला, पत्नीला ओलीस ठेवले, पतीला ओढत दुसऱ्या खोलीत नेले, त्याची हत्या केली आणि त्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले.
धारचे एसपी मयंक अवस्थी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना काही गोष्टी संशयास्पद आढळल्या. ज्या दागिन्यांची लूट झाली असे सांगण्यात आले, ते सर्व दागिने घरातच सुरक्षित सापडले. देवकृष्णच्या डोक्यावर झालेला १२ इंच खोल वार हा केवळ दरोडेखोरांचा हल्ला नव्हता, तर तो रागात केलेला प्रहार वाटत होता. प्रियांका वारंवार आपला जबाब बदलत होती. तिने स्वतःचे हात-पाय बांधून घेतल्याचा दावा केला होता, पण तिच्या अंगावर तशा कोणत्याही खुणा नव्हत्या.
कशी झाली हत्या?
कमलेशने हत्येसाठी सुरेंद्रला १,००,००० रुपयांची सुपारी दिली. घरात प्रवेश करण्याच्या क्षणापासून ते पळून जाण्यापर्यंतची ही संपूर्ण कट घटनेपूर्वीच अत्यंत बारकाईने नियोजित करण्यात आला होता. गुन्ह्याच्या रात्री, त्या प्रियांकाने घराचा दरवाजा जाणीवपूर्वक उघडाच ठेवला. आरोपीने घरात प्रवेश करताच, तिने त्याला खुणावून तिचा पती नक्की कुठे झोपला आहे, हे सांगितले. त्यानंतर ती स्वतः दुसऱ्या खोलीत निघून गेली. त्यानंतर देवकृष्ण झोपेत असतानाच, त्याच्यावर एका धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आणि त्याची हत्या करण्यात आली. ठरलेल्या योजनेनुसार, १० ते १५ मिनिटांनंतर प्रियंकाने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिचा आक्रोश ऐकून देवकृष्णची आई आणि बहीण जाग्या झाल्या.
महाराष्ट्र कनेक्शन आणि प्रेमप्रकरणाचा विळखा
प्रियांका मूळची महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहे. तपासात समोर आले की, प्रियांका आणि देवकृष्ण यांचा विवाह वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी झाला होता. दोघांच्या लग्नाला १० वर्षे झाली होती. मात्र, प्रियांकाचे तिच्या समाजातीलच कमलेश पुरोहित या तरुणाशी प्रेमसंबंध होते. तिला कमलेशसोबत राहायचे होते, पण पती अडथळा ठरत होता. हत्येच्या ५-६ दिवस आधीच ती माहेरून सासरी परतली होती. देवकृष्णला संपवण्यासाठीच ती आली होती.
पोलिसी खाक्या दाखवताच कबुली
जेव्हा पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि विसंगत जबाबांचा आधार घेत प्रियांकाची कसून चौकशी केली, तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला. प्रियकर कमलेशसोबत मिळून तिनेच पतीच्या हत्येचा कट रचला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी दरोड्याची खोटी कहाणी रचली. इंदौरमधील गाजलेल्या सोनम रघुवंशी खून प्रकरणाशी या घटनेचे कमालीचे साधर्म्य असल्याने परिसरात या हत्येची मोठी चर्चा होत आहे.