महादेव मुंडेंचा गळा कापला; तोंड, मान, हातावर १६ वार; शवविच्छेदन अहवालातून गुन्हेगारांची क्रूरता आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:28 IST2025-07-23T12:28:25+5:302025-07-23T12:28:38+5:30

परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा शवविच्छेदन रिपोर्ट हाती लागला असून, यात अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे.

Mahadev Munde's throat cut; 16 stab wounds to the face, neck, and hands; The autopsy report revealed the brutality of the criminals | महादेव मुंडेंचा गळा कापला; तोंड, मान, हातावर १६ वार; शवविच्छेदन अहवालातून गुन्हेगारांची क्रूरता आली समोर

महादेव मुंडेंचा गळा कापला; तोंड, मान, हातावर १६ वार; शवविच्छेदन अहवालातून गुन्हेगारांची क्रूरता आली समोर

बीड : परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा शवविच्छेदन रिपोर्ट हाती लागला असून, यात अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. महादेव यांचा अगोदर गळा कापला. तब्बल २० सेंमीपर्यंत लांब, ८ सेंमी रुंद आणि ३ सेंमी खोल असा हा वार होता. त्यानंतर त्यांच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले. मुंडे यांच्या अंगावर तब्बल १६ वार आहेत. प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्याचे अहवालात नमूद आहे. 
२१ ऑक्टोबर रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला. २२ ऑक्टोबर रोजी १२:१५ ते १:३० असे सव्वा तास परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन चालले. पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात अंगावर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद होते. 

त्यांच्या अंगावर रक्ताने माखलेली पांढरी बनियान, ब्राऊन कलरचा शर्ट होता. लाल करदोडा आणि पाकीट होते. चेहरा, छाती आणि हात रक्ताने माखलेले होते. सव्वा तास हे पीएम चालले होते. २० महिन्यांनंतरही यातील आरोपी निष्पन्न नाहीत. त्यामुळेच त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

कोठे किती वार?
मानेवर उजव्या बाजूला    ४ 
तोंडापासून गालापर्यंत    १
उजव्या हातावर    ३ 
डाव्या हातावर    ३
तोंडावर     १
नाकावर    १
गळ्यावर    ३

तोंडापासून कानापर्यंत वार
मानेवर वार करत असताना तो चुकविल्याने तोंडावरही वार झाल्याची शक्यता आहे. तोंडापासून कानापर्यंतही एक वार झाल्याचे नमूद असून, त्याची लांबी १३ सेंमी एवढी असून, रुंदी व खोली दीड सेंमीपर्यंत आहे.  

मृत्यूचे कारण काय?
डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल परळी शहर पोलिसांना दिला होता. त्यात अतिरक्तस्राव झाल्याने शॉकमध्ये जाऊन महादेव मुंडे यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. 

श्वसननलिका कापली
महादेव मुंडे यांच्या गळ्यावर समोरून वार केल्याने श्वसननलिका कापली गेली होती. शिवाय मोठ्या रक्तवाहिन्याही तुटल्या होत्या. महादेव मुंडे यांनी दोन्ही हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या डाव्या आणि उजव्या हातावर अंगठ्याजवळ, तळहातावर आणि मधल्या बाेटाजवळ जखमा झालेल्या होत्या. तसेच खाली पडल्यानंतर त्यांच्या डाव्या गुडघ्यालाही खरचटल्याची नोंद आहे. 

Web Title: Mahadev Munde's throat cut; 16 stab wounds to the face, neck, and hands; The autopsy report revealed the brutality of the criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.