भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:46 IST2025-12-27T10:46:02+5:302025-12-27T10:46:44+5:30
मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एका व्यक्तीने चक्क ग्रामपंचायतीला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

फोटो - ndtv.in
मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एका व्यक्तीने चक्क ग्रामपंचायतीला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग लावतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना रतलाम जिल्ह्यातील मंगरोल ग्रामपंचायत कार्यालयातील आहे. व्हिडिओमध्ये गोपाळ नावाचा स्थानिक रहिवासी इमारतीच्या आत पेट्रोल ओतून आग लावताना स्पष्टपणे दिसत आहे. कार्यालयात आग वेगाने पसरू लागल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी मोठं नुकसान टाळण्यासाठी ती विझवण्याचा प्रयत्न केला.
गावकऱ्यांनी आग लावणाऱ्या गोपाळला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. सलाखेडी पोलीस चौकीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. ताब्यात घेतल्यानंतर आरोपी गोपाळने दावा केला की, तो पीएम आवास योजनेसह (PMAY) विविध सरकारी कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी वारंवार स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधत होता, परंतु त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. गोपाळचे म्हणणं आहे की, त्याचे कुटुंब भीषण आर्थिक टंचाईत जगत आहे.
निराश होऊन उचललं टोकाचं पाऊल
अधिकाऱ्यांच्या सततच्या दुर्लक्षामुळे आणि बेजबाबदार वृत्तीमुळे निराश होऊन हतबलतेतून आपण हे टोकाचं पाऊल उचलल्याचं गोपालने सांगितलं. मात्र, ही घटना घडली तेव्हा आरोपी दारूच्या नशेत होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. तपास अधिकारी जे. सी. यादव यांनी सांगितलं की, पोलीस व्हायरल व्हिडिओसह सर्व पुरावे गोळा करत असून कायदेशीर कारवाई सुरू आहे.
गावकऱ्यांनी विझवली आग
या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. आगीवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात आलं, मात्र या घटनेने स्थानिक स्तरावरील तक्रार निवारण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील वाढत्या निराशेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. आरोपीच्या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी आणि योजनांच्या अंमलबजावणीत काही त्रुटी आहेत का, याचा तपास अधिकारी करत आहेत.