पंजाबमधील लुधियाना येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साहनेवाल मतदारसंघातील नंदपूर सूए परिसरात जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादात काँग्रेस नेते अनुज कुमार यांचा भाऊ अमित कुमारची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी अमितला घेरलं आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या अमितला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.
एसीपी हरजिंदर सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री अमित कुमार गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली होती. जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. तीन तरुण बाईकवरून आले आणि त्यांनी खाण्यासाठी काहीतरी खरेदी केलं. बिलावरून अमित आणि तरुणांमध्ये वाद झाला.
अमितने पैशांची मागणी केली, तर तरुणांनी बिल शंभर रुपयांचं असल्याचा दावा केला. वीस रुपयांवरून वाद घातला आणि मद्यधुंद असलेल्या तरुणांनी गोळीबार केला. रुग्णालयात नेत असताना अमितचा मृत्यू झाला. वेटरने सांगितलं की त्याच्यावरही गोळीबार करण्यात आला पण तो वाचला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे आणि लवकरच गुन्हेगारांना अटक करू असं म्हटलं आहे.