दारूच्या नशेत पत्नीला मारहाण, जीवे मारण्याची दिली धमकी; माजी आमदाराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 11:07 IST2023-08-22T10:59:12+5:302023-08-22T11:07:18+5:30
ब्रिजेश प्रजापतीने बाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली, त्यानंतर पीडितेच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

फोटो - आजतक
लखनौच्या पीजीआय परिसरात पत्नीवर हल्ला करणारा माजी आमदार ब्रिजेश प्रजापतीला पोलिसांनी अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. ब्रिजेश प्रजापतीने दारूच्या नशेत पत्नीला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनंतर, पीजीआय पोलिसांनी माजी आमदाराला लखनौच्या कल्ली पश्चिम भागातील साहू कॉलनीतून अटक केली. ब्रिजेशवर पत्नीला सासरच्या घरी पोहोचल्यानंतर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याशिवाय जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या अंगावर गाडी घालवण्याचाही प्रयत्न केला.
ब्रिजेश प्रजापतीने बाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली, त्यानंतर पीडितेच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशेत असलेल्या माजी आमदाराने ते मान्य केले नाही आणि गोंधळ सुरूच ठेवला. पीडित महिलेने पीजीआय पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पीडितेचा आरोप आहे की, पती आमदार झाल्यापासून त्याच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. दारू पिऊन तो रोज रात्री उशीरा घरी यायचा आणि भांडण करायचा. तो मुलांचाही गळा दाबायचा, त्यामुळे ती 15 ऑगस्टला पतीचं घर सोडून माहेरी गेली.
पत्नी घरातून निघून गेल्यावर वस्तीत येऊन वाहनांची तोडफोड करत घराचा दरवाजा तोडून शिवीगाळ करत होता. याचदरम्यान, जीवे मारण्याच्या उद्देशाने कारने चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.