उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये दुधात थुंकल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. दूधवाला दुधात आधी थुंकायचा आणि नंतर ते लोकांना द्यायचा. त्याचं हे धक्कादायक कृत्य एका घराबाहेर बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. या घटनेनंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी म्हणाले की, आम्ही व्हिडीओ पाहिला आहे आणि या व्हिडिओच्या आधारे पोलिसांकडे तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पप्पू नावाचा एक व्यक्ती नाव बदलून आणि त्याची खरी ओळख लपवून दूध देण्याचं काम करत होता. त्याच्यावर दुधात थुंकण्याचा आणि नंतर तेच दूध लोकांना देण्याचा गंभीर आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत हिंदू महासभेने गोमती नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली आहे. आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुधात थुंकताना दिसत आहे.
सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर कुटुंबातील सदस्य घाबरले आहेत. दुधात थुंकल्याचा आरोप असलेल्या तरुणाचं नाव मोहम्मद शरीफ असल्याचं समोर आलं आहे. मात्र तो लोकांना त्याचं नाव पप्पू असल्याचं सांगत होता. व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की आरोपी घराबाहेर दूध घेऊन उभा आहे.
दूध देण्यापूर्वी त्याने झाकण उघडलं आणि त्यात थुंकला. त्यानंतर त्याने पुन्हा झाकणाने बंद केलं आणि संबंधित कुटुंबाला तेच दूध दिलं. या संपूर्ण प्रकरणाबाबत अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी यांनी आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.