सतत ऑनलाईन गेम खेळतो म्हणून आईने घेतला मोबाईल; नाराज लेकाने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 18:16 IST2022-12-26T18:11:21+5:302022-12-26T18:16:49+5:30
मुलगा अनेक दिवसांपासून शाळेत जात नव्हता. त्याउलट तो दिवसभर घरात मोबाईल गेम खेळत असे. त्याला अनेकदा याबाबच समजावून सांगण्यात आले.

सतत ऑनलाईन गेम खेळतो म्हणून आईने घेतला मोबाईल; नाराज लेकाने उचललं टोकाचं पाऊल
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलवर गेम खेळण्यास नकार दिल्याने एका दहा वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे ही भयंकर घटना घडली आहे. आईने रागावल्याने या चिमुकल्याने टोकाचं पाऊल उचललं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या हुसैनगंज पोलीस ठाण्याच्या चितवापूर भागात ही घटना घडली आहे. पतीच्या निधनानंतर, कोमल (40) या दहा वर्षीय मुलगा आणि 12 वर्षीय मुलीसोबत राहत होत्या. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा अनेक दिवसांपासून शाळेत जात नव्हता. त्याउलट तो दिवसभर घरात मोबाईल गेम खेळत असे. त्याला अनेकदा याबाबत समजावून सांगण्यात आले.
घटनेच्या दिवशी आईने तो ऐकत नसल्याने मुलाला मारहाण करून त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि तेथून निघून गेली. त्याचवेळी रागाच्या भरात मुलाने बहिणीला खोलीबाहेर पाठवून दार आतून बंद केलं. बराच वेळ आतून मुलाचा आवाज न आल्याने घरच्यांनी त्याला हाक मारली. मात्र आवाज न आल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला खाली उतरवण्यात आले. मात्र तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता.
डीसीपी सेंट्रल झोन अपर्णा रजत कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने आत्महत्या केली आहे. आईच्या बाजूने कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, मुलगा मोबाईलवर गेम जास्त खेळत असे आणि त्यामुळे त्याची आई त्याला खडसावायची. याचा राग आल्याने त्याने हे पाऊल उचलले. विशेष म्हणजे ऑनलाइन गेमिंगचा समाजावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकार योग्य धोरण किंवा नवीन कायदा आणणार आहे. रेल्वे, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री वैष्णव यांनी यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"