'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 09:31 IST2025-10-30T09:30:39+5:302025-10-30T09:31:52+5:30
आसनसोलमधील कुल्टी विधानसभा मतदारसंघातील लखियाबाद अप्पर पारा येथील लॉटरी विजेता कार्तिक बाउरीच्या संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
पश्चिम बंगालच्या आसनसोलमधील कुल्टी विधानसभा मतदारसंघातील लखियाबाद अप्पर पारा येथील लॉटरी विजेता कार्तिक बाउरीच्या संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. तृणमूल बोडोचे माजी अध्यक्ष बेबी बाउरी यांच्या घराबाहेरील पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्यात कार्तिकचा मृतदेह आढळून आला. त्याच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने आसनसोल जिल्हा रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
मृत्यूची बातमी पसरताच परिसरात एकच गोंधळ उडाला. मृताची आई सबिता बाउरी यांनी बेबी बाउरी, अमरदीप बाउरी, संदीप बाउरी आणि ज्योत्स्ना बाउरी यांच्यावर हत्येचा आरोप केला. त्यांनी सांगितलं की अमरदीपने कार्तिकला त्याच्या घरी बोलावलं होतं आणि तो रात्री उशिरापर्यंत परतला नाही. कुटुंबीय त्याला शोधण्यासाठी गेले तेव्हा त्यांना कार्तिकचा किंचाळण्याचा आवाज आला आणि काही वेळातच तो रक्ताच्या थारोळ्याता पायऱ्यांवर पडलेला आढळला.
स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात जमा झाल्यावर बेबी बाउरीने दावा केला की, कार्तिक चोरी करण्याच्या उद्देशाने घरामध्ये घुसला होता. पळून जाताना तो भिंतीवरून खाली पडला. पण कार्तिकच्या आईने हा दावा फेटाळून लावला. तिने सांगितलं की, तिच्या मुलाला नुकतीच १ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे, त्यामुळे चोरीचा आरोप निराधार आहे. आईने ही पूर्वनियोजित हत्या असल्याचं म्हटलं.
सबिता बाउरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. बुधवारी पोलिसांनी बेबी बाउरी आणि अमरदीप बाउरी यांना अटक केली, तर संदीप आणि ज्योत्स्ना बाउरी अद्याप फरार आहेत. लवकरच दोघांनाही अटक करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला.