लोकलच्या मोटरमन फेकली मसाला पावडर; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 20:31 IST2019-04-17T20:30:57+5:302019-04-17T20:31:50+5:30
ही घटना शनिवारी रात्री ९.२० मिनिटांनी घडली.

लोकलच्या मोटरमन फेकली मसाला पावडर; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा
मुंबई - हार्बर लाईनवर लोकलचे मोटरमन नवल किशोर मीना ट्रेन चालवत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोळ्यांत पनीर ग्रेव्ही मसाला पावडर फेकली. मीना यांना लोकलचे आपत्कालीन ब्रेक दाबावे लागले. आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही. याबाबत रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही तपासणी सुरु करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी रात्री ९.२० मिनिटांनी घडली.
मीना हे बेलापूरहून निघणारी लोकल चालवत होते. लोकल गोवंडी स्थानकातून पुढे निघाली त्या दरम्यान एक अर्धे उघडलेले पनीर बटर मसाला पावडरचे पाकिट कुणी अज्ञात व्यक्ती मीना यांच्या तोंडावर फेकले. डोळ्यांची आग होऊ लागली आणि समोर काही मीना यांना दिसत नव्हते म्हणून त्यांनी आपत्कालीन ब्रेक दाबले. जवळ असलेल्या पाण्याने त्यांनी डोळे धुतले आणि पुढील मानखुर्द स्थानकावर मदत मागवली. मीना यांनी कंट्रोल रुमशी संपर्क साधला. पुढच्याच रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्टर थंड पाण्याचा जग घेऊन वाट पाहात होते. मीना यांना पनवेलच्या रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आले. या घटनेचा तपास सुरू आहे. रेल्वे पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. एका इसमाला हे पाकिट फेकताना पाहिलं असल्याचं काही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. त्यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार संशयिताचं रेखाचित्र रेखाटण्यात आलं आहे.