लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येचा उलगडा; तिने इंजिनियर जोडीदाराला का संपवलं? म्हणाली, "तो माझ्या मुलींना.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 09:35 IST2025-12-11T09:35:23+5:302025-12-11T09:35:55+5:30
अभियंता सूर्य प्रताप सिंह खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; २० तासांच्या चौकशीनंतर तिघींनीही कबूल केला गुन्हा

लिव्ह-इन पार्टनरच्या हत्येचा उलगडा; तिने इंजिनियर जोडीदाराला का संपवलं? म्हणाली, "तो माझ्या मुलींना.."
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे अभियंता सूर्य प्रताप सिंह यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या रत्ना आणि तिच्या दोन मुलींनी मिळूनच सूर्य प्रतापची निर्घृण हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून २० तासांहून अधिक काळ चाललेल्या चौकशीत हत्येमागील अत्यंत गंभीर कारण समोर आले आहे.
"तो माझ्या मुलींकडे चुकीच्या हेतूने पाहायचा..."
जानकीपुरम सेक्टर जी येथे अभियंता सूर्य प्रताप सिंह (वय ४०) हे त्यांची लिव्ह-इन पार्टनर रत्नासोबत राहत होते. हत्येमागील कारण सांगताना रत्नाने मृत अभियंत्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. रत्नाने पोलिसांना सांगितले की, सूर्य प्रताप सिंह तिच्या दोन्ही मुलींना दररोज मारहाण करायचा आणि त्यांना घरात कोंडून ठेवायचा, बाहेरही जाऊ देत नव्हता.
रत्नाचा मुख्य आरोप आहे की, सूर्य प्रताप तिच्या मोठ्या मुलीकडे चुकीच्या नजरेने पाहायचा आणि तिला अयोग्य पद्धतीने स्पर्शही करायचा. मुलीने विरोध केल्यास तो तिला मारहाण करायचा.
क्रूर हत्येच्या दिवशी काय घडलं?
७ डिसेंबर रोजी सूर्य प्रताप घरी परतला. त्याने रत्नाच्या मोठ्या मुलीचा मोबाईल तपासला आणि तिच्या एका मुलासोबतचा फोटो पाहिला. त्याने त्या मुलाला तिचा प्रियकर म्हणत रात्री ११ वाजेपर्यंत मोठ्या मुलीला अमानुष मारहाण केली. या सततच्या छळाला कंटाळून आई आणि दोन्ही मुलींनी रात्रभरातच सूर्य प्रतापला संपवण्याचा कट रचला.
काय प्लॅन केला?
नियोजित कटानुसार, ८ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता सूर्य प्रताप झोपलेला असताना आई आणि मुली त्याच्या खोलीत घुसल्या. दोन्ही मुलींनी त्याचे हात आणि पाय घट्ट धरले, तर आई रत्नाने धारदार चाकूने त्याचा गळा चिरला. तिघींनीही त्याला धरून ठेवल्याने बराच वेळ तडफडल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून, त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. हत्येमागील ही कारणे आणि छळाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.