दारुड्या भावोजीने घेतला मेहुण्याचा जीव; पश्चिम बंगालमधून केली आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 21:18 IST2018-08-13T21:18:10+5:302018-08-13T21:18:51+5:30
आरोपी सोबू शेखला एमआरए (माता रमाबाई आंबेडकर) मार्ग पोलिसांनी १२ दिवसांनंतर पश्चिम बंगालमध्ये अटक केली आहे.

दारुड्या भावोजीने घेतला मेहुण्याचा जीव; पश्चिम बंगालमधून केली आरोपीला अटक
मुंबई - बहिण आणि तिच्या भावोजींचं विकोपाला गेलेलं भांडण मिटवणं एका मेहुण्याच्या जीवावर बेतलं आहे. दारू पिऊन बायकोसोबत भांडणाऱ्या नवऱ्याने तेथे आलेल्या मेहुण्याला मारून टाकल्याची घटना २५ जुलै रोजी दक्षिण मुंबईमध्ये घडली आहे. या घटनेतील आरोपीचे नाव सोबू शेख असून त्या मयत मेहुण्याचे नाव रहीम आहे. आरोपी सोबू शेखला एमआरए (माता रमाबाई आंबेडकर) मार्ग पोलिसांनी १२ दिवसांनंतर पश्चिम बंगालमध्ये अटक केली आहे.
दक्षिण मुंबईमध्ये एमआरए मार्ग पोलीस ठाण्याजवळील फुटपाथवर मासे विकणारा सोबू शेख हा दारू पिऊन नेहमी बायको नाबिराला मारहाण करायचा. २५ जुलै रोजी सोबू आणि नाबिरा यांच्यात नेहमीप्रमाणेच भांडण सुरू होते. मात्र यावेळी भांडण विकोपाला गेलं होतं. त्यावेळी नाबिराचा भाऊ रहीम तेथे आला. दारुड्या भावोजीला म्हणजेच सोबूला त्याने पाहिले आणि त्याला समजावण्यासाठी त्याच्याजवळ गेला. त्यावेळी दारूच्या नशेत असलेला सोबू हा रहीमला शिव्या देऊ लागला. यात त्या दोघांत मोठे भांडण झाले. या भांडणात नशेत असलेल्या सोबूने बांबू रहीमच्या डोक्यात मारला. त्यात रहीम हा गंभीर जखमी झाला. आजूबाजूच्यांनी रहीमला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मुत्यू झाला. रहीमला मारल्यानंतर सोबू फरार होता. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला.