Life Imprisonment : हमालाची हत्या करणाऱ्या नौसेनेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 19:33 IST2022-06-21T19:32:48+5:302022-06-21T19:33:16+5:30
Murder Case : १ हजार रूपये दंड देखील ठोठावला असून दंड न भरल्यास त्याला १ महिना कारावास भोगावा लागणार आहे.

Life Imprisonment : हमालाची हत्या करणाऱ्या नौसेनेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला जन्मठेप
कल्याण: कान्हु बाळु जाधव या हमालाची हत्या करणा-या भारतीय नौसेनेचा निवृत्त कर्मचारी धनंजयकुमार सकलदिपराम सिन्हा याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. १ हजार रूपये दंड देखील ठोठावला असून दंड न भरल्यास त्याला १ महिना कारावास भोगावा लागणार आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश शौकत गोरवाडे यांनी हा निकाल दिला.
रेल्वेत माथाडी कामगार म्हणून निवृत्त झालेले ७२ वर्षीय कान्हु जाधव खडवली रेल्वे स्थानकावर हमालीचे काम करायचे आणि तेथेच रहायचे. रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना मदत करणो, रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाले, भिकारी तसेच फलाटावरील बाकडयांवर व इतरत्र झोपणा-यांवर कारवाई करण्यासाठी ते पोलिसांना मदत करायचे. तर आरोपी धनंजयकुमार सिन्हा हा कल्याण-खडवली परिसरात राहायचा. तो २००६ मध्ये भारतीय नौसेना मधून सेवानिवृत्त झाला होता. तो घरात एकटाच राहायचा. स्थानिक लोक त्याला डि.के.सिन्हा, दाढी आणि मोदी अशा टोपन नावाने त्याला ओळखत होते. तो दिवसा रात्री कधीही खडवली रेल्वे स्थानक व परिसरात भटकत असायचा.
फलाटावरील बाकडयावर अथवा इतरत्र कोठेही झोपायचा. त्याचा रेल्वेच्या प्रवाशांना त्रस व्हायचा. तेव्हा त्यास रेल्वेचे पोलिस तेथून उठवून हाकलून लावायचे. याप्रकरणी कान्हु जाधव यांची पोलिसांना मदत व्हायची. यावरून धनंजयकुमार आणि कान्हु यांच्यात भांडण, शिवीगाळी व्हायची. दरम्यान १२ फेब्रुवारी २०१८ ला कान्हु हे खडवली रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ च्या पश्चिमेस फॉब ब्रिजच्या खाली रेल्वे डिपीच्या जवळ झोपले असताना त्याठिकाणी आलेल्या धनंजयकुमारने मागील झालेल्या वादाच्या रागातून काठीने झोपेत असलेल्या कान्हू यांना जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कल्याण तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा खटल्याचे कामकाज सरकारी वकील म्हणून अॅड सचिन कुलकर्णी यांनी पाहीले. यात तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश गुरव, सहा. पोलिस उपनिरिक्षक एस बी कुटे यांचे विशेष सहकार्य लाभले.